ग्रामसुरक्षा दलाचा अध्यक्षच विकतो अवैध दारू!

0

भातकुडगाव फाटा येथे एलसीबीचा छापा; 77 हजारांचा मुद्देमाल जप्त

बक्तरपूर (वार्ताहर) – शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील हॉटेलमध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी बक्तरपूर ग्रामसुरक्षा दलाचा अध्यक्षासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान केली.
गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी स्थापन केलेल्या ग्रामसुरक्षा दलाचा अध्यक्षच यामध्ये सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शेवगाव तालुक्यात गस्त घालत असताना स्थानिक शाखेचे दिलीप पवार यांना भातकुडगाव फाटा येथील एका हॉटेलमध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती समजली.
या माहितीच्या आधारे त्यांनी गस्तीवर असलेल्या पथकाला सदरील हॉटेलवर छापा टाकण्याचे आदेश दिले. यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. ना. दत्तात्रय गव्हाणे, पो. हे. काँ. मन्सूर सय्यद, फकीर शेख, विजय ठोंबरे, पो. काँ. विशाल दळवी, पो. हे. काँ. बाळासाहेब भोपळे यांच्यासह शेवगाव पोलीस ठाण्याचे पो. काँ. त्रिंबक गाडे यांच्या पथकाने भातकुडगाव फाटा ते कुकाणा रोडवरील हॉटेल राजवैभव येथे छापा टाकला असता तेथे लहू सखाराम माने (रा. मजलेशहर) हा विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री करताना आढळून आला.
त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हॉटेल राजवैभवचे मालक राहुल शंकरराव बेडके (रा बक्तरपूर) यांच्या सांगण्यावरून दारू विक्री करत असल्याचे सांगितले. यानंतर त्याची व हॉटेलची झडती घेतली असता 2 हजार रुपये किंमतीच्या 16 सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या. लहू माने याच्या खिशात दारू विक्रीतून आलेले 25 हजार 100 रुपये व हॉटेलच्या काउंटरमधील 50 हजार रुपये असा 77 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेल्या बाटल्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या असून ताब्यातील लहू सखाराम माने (रा. मजलेशहर) याने राहुल शंकरराव बेडके (रा. बक्तरपूर) यांच्या सांगण्यावरून विनापरवाना बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी मुंबई प्रो. अ‍ॅक्ट 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यातील राहुल बेडके हा पसार असून तो बक्तरपूर ग्रामसभेने नुकत्याच स्थापन केलेल्या ग्रामसुरक्षा दलाचा अध्यक्ष असल्याचे समजते. तालुक्यात दोनच ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली असून त्याचाच अध्यक्ष अवैध दारू विक्री प्रकरणात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*