Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ग्रामरोजगार सेवकाचा राजीनामा मंजूर करू नये

Share

आडगाव ग्रामसभेत ठराव मंजूर

आडगाव (वार्ताहर) – सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड प्रकरणी बनावट मजूर दाखवून त्यात गैरव्यवहार केल्याप्रमाणी ग्रामरोजगार सेवकाने राजीनामा द्यावा म्हणून मागणी करण्यात आली. याबाबत ग्रामसभा बोलावून ग्रामरोजगार सेवकाने राजीनामा देऊ नये, असा ठराव आडगाव बुद्रुक ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

ग्रामरोजगार सेवक व सामाजिक वनीकरण विभागाची चौकशी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ग्रामरोजगार सेवकाचा राजीनामा मंजूर केल्यास घरकूल व इतर कामांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काढली जाणारी हजेरीपत्रके भरण्याची गैरसोय होणार असल्याने या सर्व बाबींचा विचार करुन ग्रामरोजगार सेवकाने अचानकपणे दिलेला राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, असा ठराव उपोषणकर्ते वगळता सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

आडगाव बु. ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यात ग्रामरोजगार सेवकाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामकाजाची अनियमितता यावरुन कारवाई करण्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्रामरोजगार सेवक बदलू नये. सबळ कारणावरुन ग्रामरोजगार सेवकाला कामावरुन काढून टाकण्यापूर्वी त्याला म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे ग्रामसेवक यांनी सांगितले. त्यानुसार ग्रामरोजगार सेवक सुभाष बर्डे यांनी आपले म्हणणे मांडले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत 2016-17 व 18-19 या कालावधीत आडगाव बु. ते निमसेवाडी या या रस्ता दुतर्फा वृक्षलागवड कामाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत होतो. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या कामाशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही.

वनीकरण विभागाकडे काम करुन घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा असल्यामुळे त्यांच्याकडील कर्मचारी, अधिकारी व पिंपरी निर्मळ येथील ग्रामरोजगार सेवक वसंत निर्मळ यांच्यामार्फत काम पूर्ण झाले आहे. आडगाव बुद्रुकचा ग्रामरोजगार सेवक म्हणून कामावर असतानाही कोणतेही काम केलेले नाही. तसेच वनीकरण विभागाने कोणतेही लेखी, तोंडी कळविलेले नाही. यासाठी साईटवर मजुरांकडून काम करवून घेणे व प्रत्यक्ष कामावर हजेरी घेणे अशोक रामभाऊ भुसाळ, बाबासाहेब लावरे, कर्मचारी पवार, सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड कोतवाल, श्रीमती आहिरे यांनी संयुक्तपणे काम केले असून मस्टर मागणी देणे व कार्यालयात जमा करणे ही कामे निर्मळ पिंपरीचे ग्रामरोजागर सेवक वसंत निर्मळ यांनी केल्याचे बर्डे यांनी सांगितले.

तीन वर्षात काम पूर्ण झाल्यानंतर वनीकरण विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी या ठिकाणी काम करीत असलेले कर्मचारी थेटे व वनक्षेत्रपाल श्री. फटांगरे यांनी सांगितले की, आमच्या कामाची सव्वादोन टक्के मानधन तुझ्या बँक खात्यावर जमा आहेत. त्यामुळे तुला मस्टरवर सही करावी लागेल. अन्यथा तुला मिळणारे मानधन रक्कम भरुन द्यावे लागेल. त्यामुळे मी मस्टरवर सह्या केल्या. नंतर हे मस्टर पाहिले असता हे झेरॉक्स मस्टर आहे असे कळाले. त्यामुळे मी या सह्या तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर केलेल्या आहेत. मी माझी सत्य बाजू ग्रामसभेत मांडली आहे. यावर निर्णय घ्यावा, असे बर्डे यांनी सांगितले. त्यानंतर सर्व बाबीवर विचार करुन व ग्रामरोजगार सेवकाची बाजू ऐकून घेऊन ग्रामरोजगार सेवक व सामाजिक वनीकरण विभागाची चौकशी या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. जर ग्रामरोजगार सेवकाचा राजीनामा मंजूर केला तर घरकुलांचे व इतर कामांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीयोजनेअंतर्गत काढली जाणारी हजेरी पत्रके भरण्याची गैरसोय होणार आहे. यामुळे ग्रामरोजगार सेवकाने अचानकपणे दिलेला राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, त्यांना पूर्वीप्रमाणे कामावर ठेवण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. यावर उपोषणकर्ते वगळता हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबतची सूचना रजत शेळके यांनी मांडली असून त्यास श्रीमती कौशाबाई राऊत यांनी अनुमोदन दिले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!