Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हागणदारीमुक्तीसाठी ग्रामपंचायतनिहाय समिती

Share

दुसरा टप्पा ः मुख्याध्यापक, अंगणवाडीसेविका, बचत गटांतील महिलेला समितीत स्थान

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या दुसर्‍या टप्प्यातील पडताळणी प्रक्रिया निश्‍चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतींमधील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणे (बाजारपेठ, यात्रास्थळ, वर्दळीचे ठिकाणे) व सर्व कुुटुंबांची स्वच्छतेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरववरून प्रत्येक गावाकरिता समिती गठीत करण्याची सूचना करण्यात आली आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय समिती गठीत करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. समितीत कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 6 सदस्यांचा समावेश असेल. प्राथमिक पडताळणी आणि फेरपडताळणी अशा दोन प्रकारच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत.

प्राथमिक पडताळणी समितीत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीकरिता पंचायत समिती विस्तार अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गटविकास अधिकारी यांना समिती स्थापनेबाबत निर्देश द्यावेत. या समितीचे कार्यक्षेत्र ग्रामपंचायत स्तरावरील पडताळणी पुरते मर्यादित राहिल.

या समितीत केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, स्वच्छाग्रही, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशासेविका, बचत गटाची एक सदस्या, जलसुरक्षक यापैकीच 6 सदस्य राहतील. ग्रामपंचायतीमधील कुटुंबसंख्या लक्षात घेऊन 200 पर्यंत 2 सदस्य, 201 ते 500 पर्यंत 3 सदस्य, 501 ते 1000 पर्यंत 5 सदस्य आणि 1000 पेक्षा जास्त असणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये 6 सदस्य निवडले जाणार आहेत.

समितीची जबाबदारी
2012 मध्ये समाविष्ठ असणारे, पायाभूत सर्वेक्षण 2012 मधून सुटलेले व पायाभूत सर्वेक्षण 2012 नंतरची वाढीव कुटुंबे, या सर्व कुटुंबांना भेटी द्याव्यात. यात कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या, शौचालयाची माहिती, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन याची पडताळणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हेतर कुटुंबाती हात धुण्याच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता, घराच्या परिसरातील स्वच्छता या बाबतींचे निरीक्षण नोंदवावे लागणार आहे.

गावातील शाळांची पडताळणी
बांधकाम कोणत्या योजनेतून करण्यात आले. विद्यार्थ्यांची संख्या, मुले व मुलींकरीता स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृह उपलब्धता, लिहिण्यात आलेले संदेश, देखभाल व दुरूस्ती, आवश्यतेनुसार सॅनिटरीपॅड डिस्पोजल मशिनची उपलब्धता, पोषण आहारातील उरलेल्या अन्नाची व खरकट्याची विल्हेवाट तसेच अन्य सुविधांची पाहणी करण्यात येणार आहे. अंगणवाडीची पडताळणी तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सार्वजनिक कार्यालये व अन्य ठिकाणांची शाळांच्या पडताळणीप्रमाणे जबाबारी पार पाडावी लागणार आहे.

बांधकाम कोणत्या योजनेतून करण्यात आले. विद्यार्थ्यांची संख्या, मुले व मुलींकरीता स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृह उपलब्धता, लिहिण्यात आलेले संदेश, देखभाल व दुरूस्ती, पोषण आहारातील उरलेल्या अन्नाची व खरकट्याची विल्हेवाट अन्य सुविधांची पाहणी करण्यात येणार आहे. पडताळणीच्या नोंदणीसाठी मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार दिवसांच्या आत पडताळणी करावी लागणार आहे. पडताळणी पूर्ण केल्यानंतर आठ दिवसांच्या आत पडताळणीचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे विहित प्रपत्रात सादर करावा लागणार आहे. या समितीतील सदस्यांना प्रत्येकी 1 हजार रूपयांचे मानधन देण्यात येणार आहे.

प्राथमिक पडताळणी समितीने पडताळणी पूर्ण केल्यानंतर झेडीपीच्या सीईओंना प्रत्येक तालुक्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या अध्यक्षतेखाल फेरपडताळणी समिती गठीत करावी लागणार आहे. या समितीचे कार्यक्षेत्र जिल्हा स्तरावरील पडताळणी पुरते मर्यादित राहिल. या समितीत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील संबंधित तालुक्याचे तालुका समन्वयक, संबंधित तालुक्याचे विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी दर्जाची अधिकारी, गट संसवधन केंद्र यांचा समावेश राहिल. यांना मात्र कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. त्यांना भाडे तत्वावर वाहन देण्यात येणार आहे. यासंदर्भात समिती सदस्यांना दहा दिवसात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर पडताळणीची कामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • समिती गठीत करण्याचे
  • अधिकार झेडपी सीईओंना
  • लोकसंख्येप्रमाणे सदस्य
  • मोबाईल अ‍ॅप देणार
  • आठ दिवसांत अहवाल द्यावा लागणार
  • समितीच्या सदस्यांना मानधन
  • 10 ऑगस्टपर्यंत कार्यवाहीचे निर्देश
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!