70 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 44 उमेदवारी अर्ज

0

अर्ज दाखल करण्याची मुदत संपली : सरपंच पदासाठी 434 तर सदस्य पदासाठी एक हजार 610 इच्छुक

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या काल अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी 434 अर्ज आले. तर सदस्य पदासाठी एक हजार 610 जण इच्छुक आहेत. यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन हजार 44 जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. 15 तारखेला अर्ज माघारीसाठी मुदत असून याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 5 सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जात होते. प्रारंभी अर्ज भरण्याचा वेग कमी होता. परंतु 8 सप्टेंबरनंतर हा वेग वाढला. काल (मंगळवारी) अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी 233, तर सदस्यपदासाठी 959 असे विक्रमी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या 2 हजार 44 झाली. अर्जांची छाननी 12 सप्टेंबरला होणार असून, अर्ज मागे घेण्याचा कालावधी 15 सप्टेंबर (दुपारी 3 पर्यंत) आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

तालुकानिहाय दाखल अर्ज
अकोले 21 ग्रामपंचायती 197 (सदस्य), 100 (सरपंच).
संगमनेर 1 ग्रामपंचायती 14 (सदस्य), 4 (सरपंच).
कोपरगाव 3 ग्रामपंचायती 89 (सदस्य), 19 (सरपंच).
श्रीरामपूर 1 ग्रामपंचायती 12 (सदस्य), 1 (सरपंच).
राहुरी 6 ग्रामपंचायत 221 (सदस्य), 44 (सरपंच).
नेवासा 17 ग्रामपंचायत 406 (सदस्य), 104 (सरपंच).
नगर 1 ग्रामपंचायत 30 (सदस्य), 6 (सरपंच).
पारनेर 2 ग्रामपंचायत 57 (सदस्य), 17 (सरपंच).
पाथर्डी 10 ग्रामपंचायत 267 (सदस्य), 66 (सरपंच).
शेवगाव 2 ग्रामपंचायत 67 (सदस्य), 15 (सरपंच).
जामखेड 4 ग्रामपंचायत 123 (सदस्य), 27 (सरपंच).
श्रीगोंदा 2 ग्रामपंचायत 127 (सदस्य), 31 (सरपंच).
एकूण 70 ग्रामपंचायत 1610 (सदस्य), 434 (सरपंच).

LEAVE A REPLY

*