195 गावांत ‘आमदार’ कोण? आज फैसला

0

दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 195 ठिकाणी ‘गावचा आमदार’ निवडण्यासाठी शनिवारी मतदान झाले. जनतेने कुणाला कौल दिला याचा फैसला आज तालुकास्तरावर तालुका निवडणूक अधिकार्‍यांच्या निगराणीत होत आहे. मतमोजणीस आज सोमवारी सकाळी 10 वाजता सुरुवात होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत कुणी बाजी मारली याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरपंचपदासाठी 637 व सदस्यपदासाठी 3 हजार 550 असे एकूण 4 हजार 187 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी जीवाचे रान केले. या सर्व मतदारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.
यावेळी पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने नवीन ‘गावचा आमदार’बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 35 गावांत सरपंच आणि सदस्यपदासाठी बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी अंतर्गतच दोन गटांत झुंज झाली.काही ठिकाणी आ. थोरात अंतर्गत दोन गटांत तर जोर्वेसह 10 गावांत थोरात आणि ना. विखे गट समोरासमोर होते. त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यात 25 गावांत निवडणुका झाल्या. त्यात अनेक ठिकाणी कोल्हे, काळे गटांत लढत झाली. सोनेवाडीत काळे-कोल्हे गटाला शिवसेना आणि परजणे यांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करत आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अकोले तालुक्यात 10 गावांत राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट एकमेकांविरोधात उतरले. चास येथे राष्ट्रवादी विरोधात सेना-भाजपने दंड थोपाटले आहे. सरपंच निवडणुकीसाठी एका अपक्षाने रिंगणात उडी घेतली. राहाता तालुक्यातील साकुरीत विखे आणि दंडवते गटांत लढत झाली. अन्य ठिकाणी विखे गटातच अंतर्गत लढत झाली.

नेवासा तालुक्यात आ. बाळासाहेब मुरकुटे आणि माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटांत चुरस होती. राहुरी तालुक्यात स्थानिक आघाड्या स्थापन करून निवडणुका लढविण्यात आल्या. काहींनी माजी खासदार प्रसाद तनपुरे-शिवाजीराव गाडे तर काहींनी आ. कर्डिले, अ‍ॅड. सुभाष पाटलांची मदत घेतली. श्रीरामपुर तालुक्यात खंडाळ्यासह बहुतांश ठिकाणी मुरकुटे-ससाणे गटांत लढत झाली. खंडाळ्यात अशोक अभंग यांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले आहे. वांगी खुर्दमध्ये सभापती दीपक पटारे गटाने नशीब अजमावले आहे. माळेवाडीत मुरकुटे, ससाणे, आदिक आणि ससाणे-मुरकुटे एकत्र अशी चौरंगी लढत झाली. पारनेर तालुक्यातही बहुतेक गावांत शिवसेना विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले होते. श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात पाचपुते, आ. जगताप, नागवडे समर्थकांमध्ये लढत झाली. काष्टीत माजी मंत्री बबनराव पाचपुते, बेलवंडीत झेडपीचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, तर घोगरगावात भोस समर्थकांची कसोटी लागली. यात आम्हीच जिंकू असा दावा अनेक गटांनी केला असला तरी मतदारांनी नेमके कुणाच्या पारड्यात मते टाकली नी कोण जिंकले, कोण हरले याचा उलगडा मतमोजणीनंतरच होणार आहे.

LEAVE A REPLY

*