Type to search

Featured सार्वमत

‘सर्वांसाठी घरे’ योजनेचा ग्रामपंचायतींना विसर

Share

राहाता तालुक्यातील अवघ्या तीन ग्रामपंचायतीचे प्रस्ताव

पिंपरी निर्मळ (वार्ताहर) – राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सहा महिन्यांपूर्वी शासन निर्णय घेऊन शासकीय व गावठाण जागेतील रहिवाशांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील रहिवाशामध्ये आनंदाचे वातावरण होते. राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीनी मात्र या आनंदावर विरजण घालण्याचे काम केले असून 60 ग्रामपंचायतीपैकी अवघ्या तीनच ग्रांमपंचायतींनी अतिक्रमण नियमित करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती व शासनाकडे सादर केले आहेत.

राज्य सरकारने सर्वांसाठी घरे या योजनेच्या माध्यमातून शासकीय तसेच गावठाण जागेवर गेल्या सन 2011 पूर्वीपासूनचे अतिक्रमण करून राहणार्‍या रहिवाशांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे ठराव करून जागाच्या मोजण्या करून व अतिक्रमणाची पडताळणी करायची तसेच शासन निर्णयाप्रमाणे संबंधीत प्रस्ताव गटविकास अधिकारी व महसूल विभागाकडे सादर करायचे होते. प्रांताधिकारी या कमिटीचे अध्यक्ष आहे. त्यांच्या शिफारशीनंतर हे प्रस्ताव जिल्हाधिकारी मंजूर करणार आहेत.

राहाता तालुक्यातील सर्व 60 गावांतील रहिवाशांना दिलासा मिळणार होता. मात्र अद्याप तालुक्यातून अवघ्या 3 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव शासनाकडे आले आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतींनी मात्र या योजनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या दुर्लक्षामुळे तालुक्यातील हजारो पात्र रहिवाशांचे हक्काची जागा मिळविण्याचे स्वप्न भंगणार आहे. तसेच शासनाच्या या चांगल्या योजनेची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात राहणार्‍या तसेच 2011 पूर्वीपासून शासकीय किंंवा गावठाण जागेवर अतिक्रमण करून घर बांधून राहणार्‍या रहिवाशांना 500 चौरस फूट जागा मोफत व त्यापुढील जागेसाठी शासकीय दराने आकारणी करून जागा मालकी हक्काने मिळणार आहे. ग्रामपंचायतीने हे प्रस्ताव तयार करायचे आहेत. प्रांताधिकारी या समितीचे अध्यक्ष तर गटविकास अधिकारी व तहसीलदार या पडताळणी समितीचे सदस्य आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2022 पर्यंत सर्वांना हक्काची घरे देण्याची योजना आहे. अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे या योजनेचाच भाग आहे. योजना सुरू झाल्यावर राहाता तालुक्यातील लोणी बु., चितळी, रांजणखोल या गावांनी मुदतीत ऑनलाईन माहिती भरली. सध्या ही साईट बंद असल्यामुळे काम बंद आहे. पुन्हा साईट सुरू झाल्यावर उर्वरित गावांचे प्रस्ताव घेता येतील.
– समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!