उक्कलगाव ग्रामपंचायत निवडणूक : सर्वपक्षिय विरोधक एकवटले; महाआघाडीच्या दिशेने प्रवास

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – उक्कलगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात होत असून, काल रात्री उशिरापर्यंत सर्वपक्षिय महाआघाडीची चर्चा सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत महाआघाडी होणारच संकेत मिळत असून, त्यावर काल सकारात्मक आणि अनुकूल चर्चा झाल्याचे समजते.
सद्यस्थितीत ग्रामपंचायतीची सत्ता देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ थोरात यांच्या ताब्यात असून, ते मुरकुटे समर्थक मानले जातात तर मुरकुटे गटाचेच अशोक साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रावसाहेब थोरात यांनी गेली 15-16 वर्षांपासून राजकारणात सहकार्याची भूमिका घेऊन त्यांना राजकीयदृष्ट्या सहकार्य केले.
या दोघांच्या मनोमिलनात पंचायत समितीचे सभापती आबासाहेब थोरात हे रावसाहेब थोरात यांच्यापासून राजकीयदृष्ट्या काहीसे दूर गेले होते. मध्यंतरी उक्कलगावच्या अंतर्गत राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होऊन आबासाहेब थोरात व रावसाहेब थोरात हे दोन गट जवळ आले. त्यात भरीस भर म्हणून माजी आ. जयंत ससाणे यांचा काँग्रेसचा गट त्यात सामिल झाला.
त्यात कॉम्रेड अण्णा पाटील थोरात यांचे पुतणे प्रकाश नानासाहेब थोरात, अ‍ॅड. डी.के.जगधने, ज्ञानदेव थोरात, सोमनाथ मोरे, विकास रामदास थोरात यांचा समावेश होता. या सर्वांच्या जोडीला इंद्रनाथ थोरात यांचे कट्टर समर्थक असलेले सोसायटीचे माजी चेअरमन जनाकाका थोरात यांचे चिरंजीव व खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल जनार्दन थोरात हे देखील या कंपूत दाखल झाले.
त्यांच्यारुपाने दीपक पटारेंचा गटही या महाआघाडीत सामिल झाला. शिवसेनेचे रवींद्र कृष्णाजी थोरात, भाजपचे अण्णासाहेब थोरात व नानासाहेब थोरात, शेतकरी संघटनेचे भास्करराव थोरात, आर.पी.आय. अशा सर्वच संघटना हळुहळू एकत्र आल्याने महाआगाडीच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. ‘तुटेपर्यंत ताणायचे नाही’ अशी सर्वांचीच मानसिकता असल्याने लवकरच महाआघाडीची घोषणा होईल असे विश्‍वसनीय वृत्त असून, सरपंच पदासह सदस्यपदाच्या पंधरा जागांवर एकास एक उमेदवार देण्याच्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत.
सत्ताधारी पार्टीकडून बारीक-सारीक हालचालींवर नजर ठेवण्यात येत असून, वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत. आघाडीत बिघाडी होण्याची त्यांना प्रतीक्षा असून, महाआघाडीच्या संयोजकांकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
राजकारणात ‘अजात शत्रू व मितभाषी’ अशी प्रतिमा आजतागायत जपलेले रावसाहेब थोरात व त्यांच्या जोडीला ‘आक्रमक पण मुत्सद्दी’ माजी सभापती आबासाहेब थोरात हे महाआघाडीसाठी तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. असे असले तरी यापूर्वीही इंद्रनाथ थोरात यांनी चाणाक्षपणे सर्वपक्षीय विरोधकांवर मात केलेली आहे.
हे दुर्लक्ष करून चालणारे नाही. ‘संयमी व विरोधकांना वाक्चातुर्याने जवळ करणारे’ इंद्रनाथ थोरात यांनी अनेक निवडणुका यशस्वीपणे हाताळ्या आहेत. या घडीला त्यांच्याकडे निवडक कार्यकर्त्यांचा संच असला तरीही त्यांचे राजकीय कसब विचारात घेता महाआघाडीला गाफील राहून चालणार नाही. इंद्रनाथ थोरात जराही विचलीत न होता सावधपणे पावले टाकत असून, निवडणूक ज्या पध्दतीने होईल त्या पध्दतीने ते निवडणुकीस सामोरे जातील हे लक्षात घ्यायला हवे.
उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असून, दिवसागणीक चुरस वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने प्रत्येकजण इर्षेला पेटला आहे. सगळ्यांनीच निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ज्यांच्यातून सरपंच निवडला जायचा ती जनता मात्र, इच्छुकांमध्ये आपल्या स्वप्नातील सरपंचाचे चित्र पहात आहे. रात्री उशिरा सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मते आजमावली आहेत असे रवींद्र थोरात यांनी सांगितले.

सोशल मीडियाचाही वापर
सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट व फोटो व्हायरल होत असून, त्यातून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, आता सोशल मीडियावरूनही जोरदार प्रचार होण्याची शक्यता आहे. काल असाच एका नेत्याच्या सत्काराचा फोटो व्हायरल झाल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र संबंधित नेता व गावातील त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला असता. असा खोडसाळपणा या काळात सुरुच असतो. असे म्हणत त्यांनी त्यास बगल दिली.

मुरकुटे गटात उभी फूट!
अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येेष्ठ संचालक रावसाहेब हरी थोरात व देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ थोरात या दोन्ही माजी आ. भानुदास मुरकुटे समर्थकांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या बैठका व व्यूहरचनेवरून दिसत असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उक्कलगावात मुरकुटेंचे दोन गट तयार झाले आहेत. आदिक गटाचा फारसा सक्रीय सहभाग या निवडणुकीत दिसत नसल्याचीही ‘चर्वीतचर्वण’ चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

*