ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जानेवारी ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला मंगळवार दि. 5 डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या रुपाने सुरुवात होणार आहे. यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे.
यामुळे गावपुढार्‍यांसाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यामुळे सर्वत्र चुरस पहायला मिळत आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने गावावर आपले वर्चस्व राहावे यासाठी गावपुढार्‍यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
अनेक ठिकाणी पार्ट्यांचा ऊत आला असून ऐन थंडीत राजकीय वातावरण गरम झाले आहे.  या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ते सोमवार (ता 11) पर्यंत(रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज दाखल करणे, 12 डिसेंबर अर्ज छाननी, 14 डिसेंबर दुपारी 3 पर्यत अर्ज मागे घेणे, त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप व मंगळवार (ता.26 डिसेंबर) रोजी मतदान व 27 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

सौ.च्या उमेदवारीसाठी श्रीं ची पळापळ..

शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर जवळपास 26 गावांत महिलांचे प्राबल्य असणार आहे. यामुळे सरपंचपदासाठी सक्षम महिला उमेदवार मिळविण्यासाठी गेली महिनाभर सर्वच गावपुढार्‍यांना मोठी कसरत करावी लागली आहे. यामुळे अनेक ठिकाणी सौ.च्या उमेदवारीसाठी श्रीं ची पळापळ पहायला मिळाली. आपली पत्नी विजयी व्हावी यासाठी अनेकजण ज्योतिषाचे उंबरठे झिजवत असून काहींनी उमेदवारी दाखल करण्यासाठी चांगला मुहूर्त शोधून ठेवला आहे.

 

LEAVE A REPLY

*