ग्रामपंचायत निवडणूक (श्रीरामपूर) : आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

0

नेत्यांची उमेदवार शोधण्यासाठी पळापळ

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील दुसर्‍या टप्प्यात होत असलेल्या दहा ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून प्रारंभ होत आहे. प्रत्येक गावातील नेतेही बुचकळ्यात पडले असून त्यांनी आपल्या गावातील प्रत्येक प्रभागात कोणता उमेदवार असावा यासाठी शोधाशोध सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची धावपळ उडाली असून गट तट निश्‍चित न झाल्यामुळे उमेदवारही आपली जागा निश्‍चित करण्यासाठी पळापळ करत आहेत. यावेळी उक्कलगाव, निमगाव खैरी, भोकर, शिरसगाव, माळवाडगाव या गावांतील निवडणुका चांगल्याच चुरशीच्या ठरणार आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद, उक्कलगाव, कान्हेगाव, गुजरवाडी, भोकर, माळवाडगाव, उंदिरगाव, निमगाव खैरी, शिरसगाव, खिर्डी या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका 26 डिसेंबर रोजी होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून प्रारंभ होत असून ती मुदत 11 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी छाननी होऊन 14 डिसेंबर रोजी चिन्ह वाटप आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ सातच दिवस राहणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ उडणार आहे. ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्यामुळे वेळेच्या आत अर्ज पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांचा जत्था आणि उमेदवारांची लगबग पहायला मिळणार आहे.
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून पैकी निमगाव खैरी, उक्कलगाव, कान्हेगाव, माळवाडगाव, खिर्डी आणि शिरसगाव या 6 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण खुले आहे तर उर्वरीत चार ग्रामपंचायतींमध्ये भोकरचे सरपंचपद हे अनुसूचित जमाती, उंदिरगाव, अनुसूचित जाती, तर गुजरवाडी व फत्याबाद या दोन ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे.
निमगाव खैरीत एकूण 5 प्रभागांत 14 जागा, माळवाडगावमध्ये चार प्रभागांत 11 जागा, उक्कलगावमध्ये 5 प्रभागांत 15 जागा , खिर्डीमध्ये तीन प्रभागांत 9 जागा, शिरसगावात 5 प्रभागांत 17 जागा कान्हेगावात तीन प्रभागांत 7 जागा राहणार आहेत तर गुजरवाडीत तीन वॉर्ड 7 जागा, फत्त्याबाद 3 वॉर्डात 9 जागा, उंदिरगाव 6 प्रभागांत 17 उमेदवार, भोकरमध्ये 5 वॉर्डात 15 सदस्य अशा प्रकारे सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात चांगला उमेदवार शोधण्याचे आव्हान प्रत्येक गटापुढे राहणार आहे. त्याहीपेक्षा गावाचा कारभार पहाणारा कारभारीही सुशिक्षीत उमेदवार देण्याचा प्रयत्न सगळेच गट करत आहेत.

 

LEAVE A REPLY

*