शेवगाव तालुक्यात 81.04 टक्के मतदान

0
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी मोठ्या उत्साहात व शांततेत सरासरी 81.04 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कुरुडगाव येथे 92.33 टक्के तर सर्वात कमी मतदान दहिगावने येथे 71.30 टक्के झाले.
सरपंचाची निवडणुक थेट जनतेतून होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने व सरपंचाच्या वाढलेल्या अधिकाराची जाण झाल्याने तसेच या टप्प्यात तालुक्यातील अनेक दिग्जांच्या गावच्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी सोमवारी 9 रोजी तहसील कार्यालयात होणार आहे.
निवडणूक असलेल्या गावामध्ये माजी आमदार नरेंद्र घुले व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे दहिगावने, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन यांचे आखेगाव, पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात यांचे खानापूर व पंचायत समिती सदस्या मिराताई लांडे यांचे जोहरापूर यांचा समावेश असल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे.
काल सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने मतदान उत्साहात झाले. मतदानाचा वेग सुरुवातीला जोरात होता. दुपारी दीड पर्यंत 57 टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला, तर दुपारी चार वाजेनंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढला.
तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी गाव निहाय झालेले मतदान : दहिगांवने- 5669 पैकी 3869 (71.30), जोहरापूर- 1588 पैकी 1284 (80.85), आखेगाव- 3097 पैकी 2532 (81.75), अमरापूर- 2485 पैकी 2090 (84.10), वाघोली – 2088 पैकी 1818 (87.06),
खामगाव- 734 पैकी 650 (88.55), रांजणी- 1239 पैकी 1056 (85.23), सुलतानपूर खुर्द- 1244 पैकी 1032 (82.95), भायगाव- 1399 पैकी 1242 (88.77), कुरुंडगाव- 1148 पैकी 1060 (92.33), प्रभुवाडगाव- 1402 पैकी 1218 (86.87), खानापूर- 1177 पैकी 975 (82.83).
या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सरपंचाची निवड थेट जनतेतून होत आहे. तसेच मतदान यंत्रावरही सरपंच व प्रभागातील सदस्य असे तीन, चार किंवा पाच मते एकाच वेळी नोंदवायचे असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला.
तहसीलदार दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैदयकीय अधिक्षक डॉ. बंकट आर्ले, गटशिक्षणाधिकारी बाळसाहेब बुगे व तालुका कृषी अधिकारी अशोक साळी हे क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान प्रक्रीया सुरळीत होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडली.

 

LEAVE A REPLY

*