Monday, April 29, 2024
Homeनगरचौथ्या दिवशी सरपंचपदासाठी 17 तर सदस्यांसाठी 105 अर्ज दाखल

चौथ्या दिवशी सरपंचपदासाठी 17 तर सदस्यांसाठी 105 अर्ज दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व 125 सदस्यांच्या निवडीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या चौथ्या दिवसअखेर सरपंचपदासाठी एकूण 22 तर सदस्यपदासाठी 133 अर्ज दाखल झाले. काल चौथ्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. काल सरपंचपदासाठी 17 तर सदस्यपदासाठी 105 अर्ज दाखल झाले. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने आज मोठी गर्दी होणार आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील 13 गावच्या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यांसाठी निवडणुकीकरीता अर्ज दाखल करण्यास 28 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी सरपंचपदासाठी अवघा एक अर्ज दाखल झाला होता. दुसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी एक व सदस्यपदासाठी 9 अर्ज दाखल झाले होते. तिसर्‍या दिवशी सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 19 अर्ज दाखल झाले.

काल गुरुवारी चौथ्या दिवशी सरपंचपदासाठी 8 ग्रामपंचायतींकरीता 17 अर्ज दाखल झाले तर सदस्यपदासाठी 8 ग्रामपंचायतींसाठी 105 अर्ज दाखल झाले. सरपंचपदासाठी काल अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक भेंडा खुर्द (5) ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल झाले. वडाळा बहिरोबा (3), कांगोणी, सुरेशनगर व माका ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी दोन तर गोधेगाव व हिंगोणी ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला.

सदस्यपदासाठी काल सर्वाधिक 31 अर्ज कांगोणी ग्रामपंचायतीकरीता दाखल झाले. त्याखालोखाल 18 अर्ज वडाळाबहिरोबा ग्रामपंचायतीसाठी, 14 अर्ज माळीचिंचोरा ग्रामपंचायतीसाठी, 12 अर्ज भेंडा खुर्द ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले. हंडीनिमगाव ग्रामपंचायतीसाठी 9 अर्ज दाखल झाले. सुरेशनगर, शिरेगाव व हिंगोणी ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी 6 अर्ज दाखल झाले. माका ग्रामपंचायतीसाठी तीन अर्ज दाखल झाले. अशाप्रकारे 8 ग्रामपंचायतींसाठी 31 अर्ज दाखल झाले. चौथ्या दिवसअखेर हंडीनिमगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 1 तर सदस्यपदासाठी 6 अर्ज दाखल झाले.

सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 2 तर सदस्यपदासाठी 9 अर्ज दाखल झाले. गोधेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एक अर्ज दाखल झाला तर सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नही. भेंडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 6 तर सदस्यपदासाठी 12 अर्ज दाखल झालेले आहेत. माका ग्रामपंचायतीच्या सरपंपदासाठी 2 तर सदस्यपदासाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. शिरेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 10 अर्ज दाखल झालेले आहेत मात्र सरपंपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

वडाळाबहिरोबा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 37 अर्ज दाखल झालेले आहेत. माळीचिंचोरा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 16 तर सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. हिंगोणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एक तर सदस्यपदासाठी 6 अर्ज दाखल आहेत. कांगोणी ग्रामपंचायतीच्या सरपंपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 32 अर्ज दाखल झालेले आहेत.

आज शेवटचा दिवस

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. चौथ्या दिवसअखेर खुपटी, चिंचबन व अंमळनेर या तीन ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या