ग्रामपंचायत निवडणुक : चुकीच्या निकाल प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी निलंबित

0
नाशिक । निफाड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत अनुसूचित गटातील महिला उमेदवाराचे मत इतर मागासवर्ग प्रवर्गातील पुरुष उमेदवाराला तर इतर मागास प्रवर्गातील पुरुष उमेदवाराचे मत महिला उमेदवाराला दाखवत चुकीचे उमेदवार विजयी म्हणून घोषित केल्याचा गोंधळ झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले असून फेरमतमोणीची मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.

7 ऑक्टोबरला ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींत प्रत्यक्ष मतदान झाले. यात शिंगवे गावात निवडणूक घेण्यात आली. त्यात मतमोजणी झाल्यानंतर उमेदवारांचे निकाल जाहीर करताना निवडणूक आधिकार्‍यांनी घोळ घातल्याचे समोर आले.

शिंगवे गावातील प्रभाग 2 मध्ये अनुसूचित जाती महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा दोन गटांचे आरक्षण होते. अनुसूचित गटाच्या जागेवर अनिता केदू कोरडे व सुशीला प्रभाकर पवार यांच्यात लढत होती. तर इतर मागास प्रवर्गात भास्कर रामभाऊ डेर्ले व संजय यशवंत डेर्लेे यांच्यात लढत होती. निवडणुकीसाठी अनिता कोरडे, सुशीला पवार आणि नोटा तसेच भास्कर डेर्ले, संजय डेर्लेे आणि नोटा या क्रमाने निवडणूक यंत्रावर नावे होती. त्यानुसार मतदारांनी मतदान केले. मतदान संबंधित उमेदवारांच्या नावावर जमा झाले.

इथपर्यंत सगळे व्यवस्थित झाले. निकाल जाहीर करताना मात्र निवडणूक निर्णय आधिकार्‍यांनी अनिता कोरडे यांना पडलेली मते भास्कर डेर्लेे यांना दाखवत श्रीमती कोरडे यांच्या मतांच्या आकडेवारीवरून भास्कर डेर्ले यांनाच परस्पर विजयी म्हणून जाहीर केले. तर सुशीला पवार यांना पडलेली मते संजय डेर्लेे यांना पडल्याचे जाहीर करीत दोन्ही निकाल परस्पर जाहीर केले. निकालानंतरच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निकाल जाहीर करण्याच्या नुमान व्हीएम 4 नमुन्यात हे निकाल जाहीर करीत ते निवडणूक आयोगाला कळवले. त्यानुसार विजयी म्हणून जाहीर झालेल्या उमदेवारांनी जल्लोषात मिरवणुका काढल्या.

निलंबन, वेतनवाढ रोखली : महिलांच्या मतदानावर पुरुष उमेदवार विजयी केले गेल्याचे लक्षात आल्यावर निफाडच्या तहसीलदारांनी हा गोंधळ निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिल्यावर निवडणूक अधिकारी तथा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी तातडीने हा प्रकार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या लक्षात आणून दिला. निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.पाटील यांना त्वरित निलंबित करण्यात आले. तर तहसीलदार विनोद भामरे व नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांंच्या दोन वेतनवाढी रोखण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*