राहुरी तालुक्यात सरासरी 85.04 टक्के मतदान

0

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील अत्यंत अटीतटीच्या झालेल्या 11 पैकी 10 ग्रामपंचायतींत ताहाराबाद आणि कोंढवड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. एकूण 10 ग्रामपंचायतींत सरासरी 85.04 टक्के मतदान झाले. सोमवार दि. 09 रोजी मतमोजणी होणार असून त्याचदिवशी 10 सरपंचपदाचा फैसला होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राहुरी तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. खडांबे खुर्दला सर्वात कमी तर केंदळ खुर्दला विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.

ब्राह्मणगाव भांड येथील सरपंच व सदस्यांची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. तर कोंढवड येथे मतदानाच्या वेळी दोन गटात जोरदार वादावादी झाली. येथील काही मतदान अधिकारी मतदारांना ठराविक उमेदवारांना मतदान करीत असल्याचा आरोप करीत एका गटाच्या जमावाने मतदान केंद्रात जाऊन जाब विचारल्याने सुमारे एक तास मतदान प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे गावात तणाव वाढला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडून मतदान सुरळीत झाले.

यंदा सरपंचपद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. काल शनिवारी (दि. 07) सकाळीच मतदानाला प्रारंभ झाला. दिवसभर कार्यकर्ते, उमेद्वार आणि मतदारांची मोठी लगबग पहायला मिळाली. 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. यात महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर वृद्धांनीही आपला मतदानाचा अधिकार बजाविला. मतदारांना आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांचा सर्रास वापर करण्यात आला. या निवडणुकीत हायटेक यंत्रणेद्वारे प्रचार करण्यात आला होता. तर अनेकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. कोंढवड येथे दोन गटांत जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. तर ताहाराबाद येथे मतदानाच्या अ‍ॅथॉरिटीवरून दोन गटांत जोरदार वादंग झाले. वातावरण काही तणावपूर्ण बनले. त्यामुळे ताहाराबाद येथेही पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तर कोंढवड येथेही पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मतदान नंतर सुरळीत सुरू झाले. आरडगाव, केंदळ खुर्द, मानोरी, तुळापूर, सोनगाव, कोल्हार खुर्द, खडांबे खुर्द, मांजरी येथे शांततेत मतदान झाले. सर्वत्र मतदानाचा उत्साह पहायला मिळाला. मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने 10 ग्रामपंचायतीमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली. राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या या दहाही ग्रामपंचायत महत्वाच्या असल्याने या निवडणुकांना विशेष महत्व आले होते.

यंदा सरपंचपद हे थेट जनतेतून असल्याने गेल्या महिनाभरापासून ग्रामीण भाग राजकीयदृष्ट्या ढवळून निघाला होता. काल 10 सरपंचांच्या जागेसाठी 36 तर सदस्यपदाच्या 115 जागांसाठी 221 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी तर काही गावात सरपंचपदासाठी 6 उमेद्वारांमध्ये जुगलबंदी झाली. अपक्षांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चांगलीच रंगभरणी झाली. सरपंचपदाचे उमेद्वार आपापल्या गावी मतदान केंद्रासमोर ठाण मांडून बसले होते. तर सदस्यपदाच्या उमेदवारांमध्येही जोरदार रस्सीखेच झाली.

मतदानाची गावनिहाय टक्केवारी –
आरडगाव 88.89 टक्के, केंदळ खुर्द 96 टक्के, मानोरी 88.09 टक्के, ताहाराबाद 93 टक्के, तुळापूर 93.50 टक्के, सोनगाव 88 टक्के, कोल्हार खुर्द 83 टक्के, कोंढवड 89.56 टक्के, खडांबे खुर्द 82.54 टक्के, मांजरी 92.40 टक्के, अशी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, मतदानानंतर गावगावच्या पारावर सायंकाळी कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक निकालाविषयी पैजा लावण्यात आल्या.  

LEAVE A REPLY

*