पुणतांबा ग्रामसभेत प्रभाग रचनेवर ग्रामस्थांचा आक्षेप

0

प्रभागानुसार आरक्षणाची सोडत जाहीर

पुणतांबा (वार्ताहर)– मार्च 2018 मध्ये पुणतांबा ग्रामपंचायतीच्या होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना व त्या आधारे काढण्यात येणार्‍या आरक्षणाच्या सोडतीसाठी मंगळवारी बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत उपस्थित बहुतांशी राजकीय नेते व ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला. यावेळी काही वेळ जोरदार वादावादीही झाली. प्रभाग पुनर्रचना मान्य नसल्यामुळे याबाबत अनेकांनी लेखी हरकती देण्यास सुरुवात केली असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धारही व्यक्त केला.
सरपंच सौ. छायाताई जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पंडित दीनदयाल सांस्कृतिक भवनात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणुकीच्या कामासाठी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून राहाता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.बी. गायकवाड, कामगार तलाठी गणेश वाघ तसेच उपसरपंच प्रशांत वाघ, जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी,
पुणतांबा विकास आघाडीचे संस्थापक धनंजय जाधव, डॉ. धनंजय धनवटे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, सुभाष वहाडणे, गणेशचे संचालक राजेंद्र थोरात, बाळासाहेब चव्हाण, प्रणिल शिंदे, भाऊसाहेब केरे, सर्जेराव जाधव, संभाजी गमे, सुधाकर जाधव, अशोक धनवटे, नामदेव धनवटे, ग्रामसेवक आर.बी. डुबे, अनिल नळे, दादा सांबारे, राजू शिरसाठ, राहुल जोगदंड, बाळासाहेब जाधव, संदीप वहाडणे, अमोल सराळकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मार्च 2018 ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रभाग प्रारूप रचनेबाबत संक्षिप्त माहिती देण्यास सुरुवात केली. तसेच ज्या प्रभागात सदस्य संख्या दोन होती त्यात बदल घेऊन ती तीन होणार व रोटेशन पध्दतीने दुसर्‍या प्रभागाची संख्या दोन होऊन काही प्रभागांची पुनर्रचना होईल असे स्पष्ट केले.
यावेळी प्रभाग एकची संख्या दोन वरून तीन व दोनची संख्या दोन होणार असून त्यानुसार प्रभागांच्या पुर्नरचनेचा प्रारुप तपशील जाहीर केला. यावेळी लोकसंख्येनुसार प्रारूप बदल स्पष्ट करताना काही प्रभागाचा काही भाग दुसर्‍या प्रभागाला जोडल्याचे व काही भाग वगळल्याचे स्पष्ट करताच अनेकांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रभाग एकला इंदिरानगर व इतर काही भाग समाविष्ट करण्यात आल्याचे तसेच प्रभाग दोन मधून काही भाग वगळल्याचे निदर्शनास आणून दिले.
प्रभाग तीनमध्ये रयत शाळेजवळचा परिसर सिध्दार्थनगर, लोंढे गल्लीपर्यंत भाग समाविष्ट झाल्याचे तसेच प्रभाग चारमध्ये शेतीशाळा, आशा केंद्र श्रीकृष्णनगरचा काही भाग तसेच प्रभाग सहाचा 19 चारी लोकवस्तीचा भाग प्रभाग पाचला जोडल्याचे समजताच सुभाष वहाडणे, प्रशांत वाघ, धनंजय जाधव, सर्जेराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, अशोक धनवटे, डॉ. धनंजय धनवटे, नामदेव धनवटे, सुधाकर जाधव, अमोल सराळकर, संभाजी गमेसह अनेकांनी जोरदार आक्षेप घेतला. रोटेशन पध्दतीने ज्या प्रभागांची सदस्य संख्या कमी जास्त होणार होती त्याच प्रभागांची पुनर्रचना करावी.
तीन चार पाच सहा या प्रभागांची पुनर्रचना करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करून अधिकार्‍यांना धारेवर धरले. यावेळी काही काळ गोंधळही झाला. श्री. गायकवाड यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ज्यांना आक्षेप असेल त्यांनी लेखी हरकती द्याव्यात असे स्पष्ट केले व त्यानंतर लहान मुलांच्या हाताने आरक्षणाची सोडत काढली. प्रभागानुसार अनुसूचित जाती जमाती ना. मा. प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष माहिला याबाबतचे सतरा जागा बाबतचा आरक्षणानुसार प्रभागानुसार तपशील जाहीर केला. आरक्षण सोडतीत ही रोटेशननुसार बदल न झाल्यामुळे काही प्रभागातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
 • प्रभागानुसार आरक्षण  –
  प्रभाग- 1 सर्वसाधारण पुरुष 1 अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्ग 1 ना. मा. प्रवर्ग स्त्री 1,
  प्रभाग-2 अनुसूचित जमाती पुरुष 1 सर्वसाधारण स्त्री 1,
  प्रभाग- 3 ना.मा. प्रवर्ग पुरुष 1 सर्वसाधारण स्त्री 1 अनुसूचित जमाती स्त्री वर्ग 1,
  प्रभाग- 4 सर्वसाधारण पुरुष 1 अनुसूचित जागी प्रवर्ग पुरुष 1 ना.मा प्रवर्ग स्त्री 1,
  प्रभाग. 5 सर्वसाधारण पुरुष 1 ना. मा प्रवर्ग पुरुष 1 अनुसूचित जाती स्त्री 1,
  प्रभाग- 6 सर्वसाधारण पुरुष 1 सर्वसाधारण स्त्री 1 ना.मा प्रवर्ग स्त्री 1 अशा प्रकारे प्रारूप प्रभाग रचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणाच्या नियमानुसार स्त्रीयांना पन्नास टके आरक्षण देण्यात आले आहे. याबाबद 11 तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे व अंतिम यादी 8 जानेवारी 2018 ला प्रसिध्द होणार आहे. प्रशांत वाघ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*