पाथर्डीत तालुक्यात 76 टक्के मतदान

0
पाथर्डी (प्रतिनिधी)- तालुक्यातील 11 गावांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत सरासरी 75.62 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार व 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सुमारे 225 कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तालुक्यातील ग्रामपंचायती-साठी झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. भालगाव – 78 टक्के, कोल्हार-73.39 टक्के, कोळसांगवी-81.11 टक्के, जिरेवाडी-72.98 टक्के, सोनोशी-12.94 टक्के, वडगाव-78.16 टक्के, कोरडगाव-80.31 टक्के, निवंडुगा-79.12 टक्के तिसगाव-78.80 टक्के, वैजुबाभूळगाव-89.10 टक्के, मोहरी-85.92 टक्के असे मतदान झाले.
सकाळपासूनच मतदान करण्याची गती कमी होती. दुपार नंतर गती थोडी वाढली. 11 ग्रामपंचायतींच्या 40 प्रभागांत मतदान झाले. भालगाव येथे एका उमेदवाराच्या नातलगाने पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर प्रशासन व पोलीस दोन्ही विभागांतील अधिकारी सतर्क झाले. भालगाव, कोल्हार व तिसगाव येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सर्वात जास्त मतदान वैजुबाभूळगाव येथे तर सर्वात कमी मतदान सोनोशी गावात झाले.
तहसीलदार नामदेव पाटील यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांशी संपर्क ठेवून दिवसभर तालुक्यात दौरा करीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांच्या मदतीने काम पाहिले. सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*