पारनेर तालुक्यातील मिनी आमदारकीचा प्रचार रंगला

0

भाळवणीत, गोरेगाव, ढवळपुरी, वनकुटे ग्रामपंचातींकडे तालुक्याचे लक्ष

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील 16 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून रंगत वाढली आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण भाळवणीमध्ये तब्बल चौरंगी लढत रंगत असून गोरेगाव, ढवळपुरी, वनकुटे व पळशी या मोठ्या गावात दुरंगी लढती होत आहेत.
तालुक्यातील संवेदनशिल असलेल्या भाळवणीमध्ये राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली असून दोन कार्यकर्त्यांचे दोन मंडळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. याचा फायदा शिवसेनेच्या मंडळाला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर गावातील नागेश्‍वर मित्रमंडळाने राजकीय पक्षांना मुठमाती देवून स्वतंत्र आघाडी निर्माण केली आहे.
शिवसेना प्रणीत माजी पंचायत समिती सदस्य विकास रोहकले यांच्या मातोश्री लीलाबाई रोहोकले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत अशोक रोहोकले यांच्या पत्नी वनिता व माजी सरपंच बाबाजी तरटे यांच्या पत्नी मिराबाई त्यातच पक्षविरहीत नागेश्वर प्रतिष्ठानचे संदीप रोहोकले यांच्या पत्नी उषाताई असे चार उमेदवार सरपंच पदाच्या शर्यतीत आहेत.
यातील बंडू रोहकले यांच्या गटाने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यांच्या सोबत माजी सरपंच प्रा.भुजबळ, संदीप ठुबे, माजी अध्यक्ष गंगाधर रोहोकले आहेत. अशोक रोहोकले यांच्या सोबत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष काँग्रेसचे पदाधिकारी संभाजी रोहोकले, माजी पंचायत समिती सदस्य नाना रोहोकले, माजी सरपंच ठकासर रोहोकले.
तर राष्ट्रवादीचे बाबाजी तरटे यांच्या सोबत माजी उपसभापती केरूअण्णा रोहोकले, संदीप रोहोकले यांच्या सोबत त्यांचे चुलते माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहोकले यांची फौज आहे. या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गोरेगावमध्ये जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नी सुमन या शिवसेना प्रणीत गटाकडून सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय अभय नांगरे हे उमेदवार आहेत.
अभय हे तांबे यांचे कट्टर समर्थक होते पण त्यांना संधी न दिल्याने त्यांनी पंचायत समितीचे सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते, भाजपाचे बाळासाहेब नरसाळे, राष्ट्रवादीचे बाजीराव पानमंद यांच्या साथीने तांबेना शह देण्याची रणनिती आखली आहे. गोरेगावमध्ये सरपंचपदासाठी चार उमेदवार असले तरी तांबे व नांगरे यांच्यात खरी लढत मानली जात आहे.
ढवळपुरी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी चार उमेदवार आहे. काँग्रेस व शिवसेना प्रणीत माजी सरपंच डॉ.राजेश भनगडे व राष्ट्रवादी प्रणित बबन पवार यांच्यातच दुरंगी लढत होईल. डॉ. भनगडे यांना राष्ट्रवादीच्या गोटातून आपल्या गटात आणण्यात पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यशस्वी ठरले आहेत. तालुक्यातील सर्वच पक्ष व गटातील उच्चशिक्षित व संस्कारशील तरुणांना एकत्र आणण्याच्या सभापती झावरे यांच्या रणनीतीचा हा एक भाग मानला जातो.
येथे 17 सदस्य पदाच्या जागा असून 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यातील 8 आमच्या व 3 राष्ट्रवादीच्या असल्याचा दावा काँग्रेस-सेना आघाडीने केला आहे.
वनकुटेमध्ये शिवसेनेचे तालुका युवा आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.राहुल झावरे व राष्ट्रवादीचे भानुदास गागरे यांच्यात चुरशीची दुरंगी लढत होत आहे. पळशी मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत दुरंगी लढती होत आहेत. मंगल मधे व रूपाबाई दुधवडे यांच्यात लढत होत आहे.
इतर ग्रामपंचायतमध्ये सिद्धेश्वरवाडी, हातलखिंडी, कोहोकडी, गुणोरे, पिपळगाव तुर्क, पुणेवाडी, चोभूत, पाडळी कान्हूर, भोंद्रे, करंदी येथील निवडणुका होत आहेत. म्हस्केवाडीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यातील बहुतेक गावे पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांच्या गणातील आहेत. त्यामुळे त्यांना आपला गट प्रबळ करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

भाळवणीत, गोरेगाव, ढवळपुरी, वनकुटे या चारही प्रमुख ग्रामपंचायत विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे यांच्या मतदारसंघामधील आहेत. ग्रामपंचायत ह्या स्थानिक प्रश्नावर लढल्या जात असल्या तरी त्यामुळे त्यांचे व अर्थातच त्यांचे पुत्र राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांच्या नेतृत्वाचा कसही या निवडणुकीत लागणार आहे.

LEAVE A REPLY

*