नगर :तालुक्यातील प्रमुख नेत्यांना मतदारांकडून घरचा रस्ता

0

नेत्यांना मतदारांचा धक्का

अहमदनगर (प्रतिनिधी) – थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निवडणुकीत नगर तालुक्यातील सामान्य मतदारांनी दिग्गज नेत्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. तालुका पातळीवरील अनेक नेते ग्रामपंचायत मध्ये पराभूत झाले. कृषी उत्पन्न बाजास समिती उपसभापती, संचालक, पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य यांसह तालूक्यातील अनेक प्रस्थापितांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला.

नगर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सैनिक लॉन या ठिकाणी पार पडली. या मतमोजणीत प्रस्थापितांना अनेक धक्के मतदारांनी दिले. तालुक्यातील बहूचर्चित असणार्‍या वाळकी ग्रामपंचायती मध्ये सत्ताधारी भाऊसाहेब बोठे गटाने सत्ता राखली. त्यांची स्नुषा स्वाती बोठे सरपंच म्हणून विजयी झाल्या पण स्वत: भाऊसाहेब बोठे यांना मनोज भालसिंग या नवख्या तरूणाकडून पराभव पत्करावा लागला. येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक दिलीप भालसिंग यांचा पराभव झाला.

नेप्ती येथे सत्ताधारी संजय जपकर गटाला पराभूत करत माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण होळकर गटाने सत्ता हिसकावून घेतली. सारोळा कासार मध्ये पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी सत्ता राखली. तेथे शिक्षक नेते संजय धामणे व गोरख काळे या गटाचा पराभव झाला. संवेदनशील नागरदेवळे मध्ये सत्ताधारी राम पानमळकर गटाने सत्ता राखली. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या गटाला पुन्हा पराभव पत्करावा लागला.

बाबुर्डी बेंद मध्ये बाजार समितीच्या उपसभापती रेश्मा चोभे यांचा सर्व पॅनल पराभूत झाला. तेथे दिलीप चोभे, डॉ. सुधीर चोभे, सुनील खेंगट यांच्या गटाने सत्ता काबीज केली. सोनेवाडी येथे राष्ट्रवादीचे तालूकाध्यक्ष केशव बेरड यांच्या गटाचा राजेंद्र बेरड गटाने पराभव केला.

कौडगाव मध्ये बाजार समितीचे संचालक बाबासाहेब खर्से गटाचा पराभव करत त्यांचेच पुतणे धनंजय खर्से यांना सत्ता राखली. राळेगणमध्ये सुधीर भापकर यांनी पिढीजात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.जखणगाव मध्ये विद्यमान बी. आर. कर्डिले गटाचा पराभव करत बाळासाहेब कर्डिल व राजेंद्र कर्डिल गटाने सत्ता खेचून घेतली. खातगाव मध्ये बाजार समिती संचालक संतोष कुलट व शिवसेनेचे प्रकाश कुलट यांच्या गटाचा मिठू कुलट गटाने पराभव केला.

नारायण डोहोमध्ये बाजार समितीचे माजी संचालक शंकर साठे गटाचा अशोक साठे गटाने पराभव केला. आठवड मध्ये बाजार समितीचे माजी चेअरमन बाबासाहेब गुंजाळ गटाकडून राजेंद्र मोरे यांनी सत्ता खेचून घेतली. कापूरवाडी मध्ये राजीव गांधी पतसंस्थेचे उद्धव दुसुंगे आणि कानिफ कासार गटाचा पराभव करत परसराम भगत गटाने बाजी मारली. टाकळीमध्ये शिक्षक नेते रा.वि.शिंदे गटाकडून सुनील नरवडे गटाने सत्ता खेचून घेतली. मदडगावमध्ये अनिल शेडाळे गटाने सत्ता राखली.

वडगावमध्ये तालुका खरेदी विक्री संघाचे अनिल ठोंबरे गटाने सरपंच पद राखले पण सदस्य बहूमत गमावले. उक्कडगाव मध्ये नवनाथ म्हस्के गटाने, दहिगाव मध्ये मधुकर म्हस्के गटाने, रांजणी मध्ये बाळासाहेब चेमटे, उत्तम राव चेमटे गटाने सत्ता राखली.

पांगरमलमध्ये बाजार समिती संचालक बबन आव्हाड गटाने सत्ता राखली. आगडगाव मध्ये मच्छिंद्र कराळे गटाने नव्याने सत्ता मिळवली. सोनेवाडी चास मध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी गटाकडून ज्ञानदेव दळवी व खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश सुंभे गटाने सत्ता खेचून घेतली.

नवनिर्वाचित सरपंच – रांजणी – बाळासाहेब चेमटे, वाळकी- स्वाती बोठे, बाबुर्डी बेंद- अशोक रोकडे, पिंपळगाव कौडा- सतीश ढवळे, साकत- जाईबाई केदारे,  वडगाव तांदळी- कविता ठोंबरे, दहिगाव-मधुकर म्हस्के,  आठवड- राजेंद्र मोरे, सारोळा बद्दी- सचिन लांडगे, मदडगाव- सुनीता शेडाळे, सोनेवाडी पिला- मोनिका चांदणे, आगडगाव- मच्छिंद्र कराळे,  नांदगाव- सुनिता सरक, नेप्ती- सुधाकर कदम, शेंडी- सीताराम दाणी, कापूरवाडी- संभाजी भगत, टाकळी= सुनील नरवडे, खातगाव- संगिता कुलट,  जखणगाव- सविता कर्डिले,  सारोळा कासार- आरती कडूस, नागरदेवळे- सविता पानमळकर,  सारोळा बद्धी- सचिन लांडगे,  राळेगण म्हसोबा- निलेश साळवे, कौडगाव= धनंजय खर्से,  नारायण डोहो- सविता गायकवाड, उक्कडगाव- नवनाथ म्हस्क यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*