जामखेड तालुक्यातील रत्नापूर, राजुरी, शिवूरला सरासरी 84 टक्के मतदान

0
जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील रत्नापूर, राजुरी व शिवूर ह्या तीनही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान झाले. मतदान घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्रास वाहनांचा वापर करून मतदान करून घेतले तर बाहेरगावी असलेले मतदान आणून चुरशीने मतदान घडवून आणले. तीनही ग्रामपंचायत मध्ये सरासरी 84 टक्के मतदान झाले.
रत्नापूर, राजुरी व शिवूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हे तीनही गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शंभर मिटर अंतरावर दुचाकी व चारचाकी वाहने आणण्यास मनाई करण्यात आली होती. रत्नापूर ग्रामपंचायतसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय वारे व विद्यमान पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत मोरे यांच्या दोन गटात सरळ लढत होत आहे.
सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. खरी लढत दोन सख्ख्या भावात होत आहे. दत्तात्रेय वारे यांच्याकडून डिगांबर वारे तर सुर्यकांत मोरे गटाकडून दादासाहेब वारे यांच्यात असून प्रभाग एक मधील तिनही उमेदवार सुर्यकांत मोरे यांच्या गटाचे बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे तेथे फक्त सरपंच पदासाठी मतदान झाले. तर प्रभाग दोन व तीन यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसाठी व सरपंच पदासाठी चुरशीने मतदान झाले. एकूण 89 टक्के मतदान झाले.
शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर यांनी पुतणे हनुमंत उतेकर व विरोधी गटाकडून अमोल काळे मैदानात असून सरळ लढत होत आहे. तर नऊ पैकी दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर सात सदस्यांसाठी निवडणूक चुरशीने होऊन एकूण 85 टक्के मतदान झाले.
राजुरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी गणेश कोल्हे व सुभाष काळदाते यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. तर नऊ जागेसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही बाजूने मतदान आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले गेले.एकंदर तीनही ग्रामपंचायत साठी चुरशीने मतदान घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भर उन्हात जाऊन मतदार घराबाहेर काढले व मतदान करून घेतले. सरासरी 84 टक्के शांततेत मतदान झाले.

 

LEAVE A REPLY

*