राहुरीत विखे, कर्डिले, अ‍ॅड. पाटील गटाची सरशी

0

आरडगाव, मानोरी, तुळापूर, ताहाराबादला सत्तांतर प्रस्थापितांविरूद्धचा रोष मतदान यंत्रातून प्रकट चार ग्रामपंचायतीत महिलाराज  

डॉ. तनपुरेचे संचालक रवींद्र म्हसे पराभूत
उपसभापती रवींद्र आढाव यांना मानोरीत अपक्षाची धोबीपछाड ग्रामपंचायतीच्या राजकारणात नवीन चेहरे झळकले

राहुरी (प्रतिनिधी)- अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राहुरी तालुक्यातील 11 पैकी 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात काही ठिकाणी प्रस्थापितांना दणका बसला तर काही गावात पक्ष आणि गटातटाला डावलून मतदारांनी कौल दिला. मानोरीत तर चक्क अपक्षांना सरपंचपदावर बसविले. या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले.
तनपुरे गटाला अनेक ठिकाणी पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तर विखे, अ‍ॅड. सुभाष पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले गटाला चांगले यश मिळाले. आरडगावला डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे यांना पराभवाचा धक्का बसला. काही ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी सत्ता राखण्यात सत्ताधार्‍यांना यश आले.
मांजरी येथे गेल्या 25 वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता राखण्यात चंद्रगिरी जनग्रामविकास मंडळाला यश आले. खडांबे खुर्द येथे विखे, पाटील, कर्डिले गटाने सत्ता राखण्यात यश मिळविले. त्यांनी तनपुरे गटाचा धुव्वा केला.
मानोरी व आरडगावला सत्तांतर झाले. ताहाराबादला तनपुरे गट सत्तेवरून पायउतार होऊन विखे, कर्डिले गटाच्या ताब्यात सत्ता आली. ताहाराबादला 11 पैकी 8 जागा विखे, कर्डिले गटाला तर तनपुरे गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले.
कोंढवड येथे सत्ताधार्‍यांनी अत्यंत अटीतटीच्या सामन्यात सत्ता राखून तनपुरेप्रणित विरोधी गटाचा सपशेल धुव्वा उडविला. तनपुरे गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. कोंढवड येथील हनुमान सेवा मंडळाचे संभाजीराजे पेरणे, सरपंच साहेबराव म्हसे, उत्तमराव म्हसे, अशोकराव हिवाळे यांनी नेतृत्व केले. सोनगाव ग्रामपंचायतीत दोन्ही गट विखे यांचे समर्थक होते. मात्र, येथे जनसेवा विकास आघाडीला सरपंचांसह 11 पैकी 7 जागा मिळाल्या.
सोनगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक मच्छिंद्र अंत्रे यांच्या पत्नीचा पराभव झाला. तर दहा वर्षांपासून सरपंच असलेल्या भाऊसाहेब अंत्रे यांचा दारूण पराभव झाला. तुळापूरला सरपंचपदासाठी सून आणि सासूमध्येच जोरदार रस्सीखेच झाली. यात सूनबाईंचा विजय होऊन ग्रामविकास आघाडीला सरपंचपदासह 8 पैकी 6 जागा मिळाल्या.
मानोरी ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव यांच्या नेतृत्वाखालील पॅनल सपशेल पराभूत झाला. येथे शेतकरी परिवर्तन मंडळाने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ता काबीज केली. शेतकरी मंडळाचे नेतृत्व डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, माजी संचालक निवृत्ती आढाव, बाळूकाका वाघ, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष उत्तमराव खुळे, पोपटराव जाधव, रणजित आढाव यांनी केले.
ब्राम्हणगाव भांडसह राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सत्तेत नव्या चेहर्‍यांना संधी मिळाली. काही गावांत प्रस्थापितांविरूद्धचा रोष मतदारांनी यंत्रातून व्यक्त केला. यावर्षी थेट जनतेतून सरपंचपदाची निवड असल्याने यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा यंदा मतदानाची विक्रमी नोंद झाली. मतदारांनी यंदा उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून आढळून आले.
कोंढवड, ताहाराबाद, केंदळ खुर्द येथे पुन्हा महिलाराज अवतरले. तर तुळापूरला अनेक वर्षानंतर महिलाराज आले. तुळापूरला पंचायत समितीचे माजी सभापती भीमराज हारदे यांच्या विखे गटाला शह देण्यासाठी त्यांचेच चुलतभाऊ बाळकृष्ण हारदे यांनी कर्डिले व तनपुरे गटाची मोट बांधून सत्ता काबीज केली. त्यामुळे भीमराज हारदे यांचा गट येथे सत्तेवरून पायउतार झाला आहे.
राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत आमदार शिवाजीराव कर्डिले व ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळाला सरपंचांसह 9 जागांवर दणदणीत विजय मिळाला.
तर विरोधी माजी आमदार प्रसाद तनपुरे व शिवाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व भरत पवार, सुनील हरिश्‍चंद्रे, अर्जुन खळेकर, आर.डी. हरिश्‍चंद्रे, आदिनाथ पारे, प्रभाकर हरिश्‍चंद्रे, तर जनसेवा मंडळाचे नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब लटके, अण्णासाहेब शेळके, शामराव खेसमाळसकर, किशोर हरिश्‍चंद्रे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या मांजरी ग्रामपंचायतीच्या चंद्रगिरी ग्रामपरिवर्तन मंडळाला चारीमुंड्या चीत करीत चंद्रगिरी जनग्रामविकास मंडळाने पंचवीस वर्षांची परंपरा राखत एकहाती सत्ता मिळवित इतिहास रचला. पुन्हा ज्येष्ठ व्यक्तीच सरपंचपदावर निवडून दिल्याने अनुभवी व्यक्तीशिवाय पर्याय नाही हे मांजरी गावाने दाखवून दिले.जनतेतून प्रथम सरपंच होण्याचा मान विठ्ठल तबाजी विटनोर यांनी मिळविला.
मतमोजणीस सकाळी राहुरी तहसीलच्या आवारातील गोदामामध्ये सकाळी सुरूवात झाली. एकूण दहा टेबलवर इलेक्ट्रॉनिक मतमोजणी यंत्रात नोंद असलेल्या मतांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी गणेश तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रारंभी ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. पो.नि.प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता याठिकाणी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
तालुक्यातील दहाही ग्रामपंचायतीमध्ये प्रथम जनतेतून निवडून आलेले सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणेः
ताहाराबाद – सरपंच सुनीता नारायण झावरे 1065 मते मिळवून विजयी झाल्या.
विजयी ग्रामपंचायत सदस्य – दत्तू गांगड 428, बापू जगताप 412, खेमा गांगड 423, दिगंबर झावरे 222, सुनीता कुटे 241, मंदा जगदाळे 203, सुनील झावरे 414, संध्या घनदाट 420, मीरा बर्डे 374, शरद उदावंत 270, भारती किनकर 292 अशी मते मिळाली.कोल्हार खुर्द – सरपंच प्रकाश पाटील 1364 मते मिळवून विजयी झाले.
विजयी ग्रामपंचायत सदस्य – बाळासाहेब लोखंडे, नितीन घोगरे, शारदा घोगरे, किशोर घोगरे, छाया शिरसाठ, सुवर्णा शिरसाठ, गोरख कानडे, बापू केळेकर, शहाजान शेख, आशा भोसले, कविता अनाप
आरडगाव – सरपंच कर्णा जाधव 1346 मते मिळवून विजयी झाले.
विजयी ग्रामपंचायत सदस्य – धनश्री जाधव 416, मच्छिंद्र बर्डे 359, नानासाहेब म्हसे 405, आशा जाधव 335, भरत झुगे 336, कुसूम झुगे 332, सहादू झुगे 354, आशा वने 399, राणी म्हसे 345, सुनील मोरे 430, मंगल जाधव 403.
मानोरी – सरपंच शेख अब्बास 1256 मते मिळवून विजयी झाले. शेख हे अपक्ष म्हणून निवडून आले.
विजयी ग्रामपंचायत सदस्य – कविता आढाव 261, बापूसाहेब देवकाते 426, शिवाजी थोरात 439, कल्पना आढाव 381, अण्णासाहेब तोडमल 304, शकुंतला चोथे 257, मनिषा आढाव 306, मनोज आढाव 241, छाया पिले 252, शामराव आढाव 154, शकुंतला आढाव 161
सोनगाव – सरपंच राजेंद्र अनाप 900 मते
विजयी ग्रामपंचायत सदस्य- चंद्रभान अनाप 363, किरण अंत्रे 354, सुनीता अंत्रे 375, बेबी ब्राम्हणे 293, अंजूम पिंजारी 340, बाळासाहेब अंत्रे 321, साधना भोत 338, संदीप अनाप 313, वर्षा अनाप 339, सुवर्णा अनाप 281, एजाज तांबोळी 303.
मांजरी – सरपंच विठ्ठल तबाजी विटनोर 973 मते मिळवून विजयी झाले.
विजयी ग्रामपंचायत सदस्य – उषा विटनोर 338, कडूबाई चोपडे 300, लक्ष्मीबाई विटनोर 182, भीमराज विटनोर 349, राणी पोळ 331, हौसाबाई विटनोर 488, सर्जेराव विटनोर 358, बाबासाहेब विटनोर 348, कमलबाई माळी 385, दादासाहेब विटनोर 350, मच्छिंद्र घोलप 181 मते मिळाली.
तुळापूर – सरपंच हिराबाई हारदे 425 मते मिळवून विजयी झाल्या.
विजयी ग्रामपंचायत सदस्य- मंदाकिनी हारदे 138, योगिता हारदे 139, दादासाहेब हारदे 143, मंदा हारदे, विष्णु हारदे 201, बापू हारदे 234, प्रमिला हारदे 215 अशी मते मिळाली. कोंढवड – सरपंच आशाबाई म्हसे 790 मते मिळवून विजयी झाल्या.
विजयी ग्रामपंचायत सदस्य- संदीप शेजवळ 337, लिलाबाई म्हसे 305, कविता म्हसे 277, जयश्री म्हसे 300, इंद्रभान म्हसे 226, ज्ञानेश्‍वर म्हसे 289, मिनाक्षी म्हसे 231, इंद्रभान एकनाथ म्हसे 247, सुनीता म्हसे 241.
केंदळ खुर्द – सरपंच अनिता आढाव 751 मते मिळवून विजयी झाल्या.
विजयी ग्रामपंचायत सदस्य- गोरक्ष जाधव 287, सतीश आढाव 262, वृषाली आढाव 291, राजेंद्र आढाव 300, संगीता केदारी 255, मनकर्णा सूर्यवंशी 270, बाळासाहेब आढाव 326, लताबाई मगर 290, मंदाकिनी आढाव 292, अशी मते मिळाली.
खडांबे खुर्द – येथील ग्रामविकास मंडळाचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते कानिफनाथ कल्हापुरे यांनी 1247 मते मिळवून सरपंचपद पटकाविले. सदस्यपदी सुरेखा खळेकर 317, अनिता पवार 329, उज्ज्वला हरिश्‍चंद्रे 132, जॉनी पवार 141, गणेश पारे 454, अनिता कल्हापुरे 429, स्वप्नाली कल्हापुरे 329, हिराबाई नन्नवरे (बिनविरोध), तर जनसेवा मंडळाचे विष्णू खळेकर 312, देवीदास खळेकर 270, देवीदास खळेकर हे अवघ्या एकाच मताने निवडून आल्याने त्यांचा निसटता विजय झाला आहे.
ब्राम्हणगाव भांड येथे यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक ग्रामस्थांच्याच पुढाकाराने बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित 10 ग्रामपंचायतींत दुरंगी, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी तर काही ठिकाणी अगदी सहारंगी जुगलबंदी रंगली होती. ही निवडणूक विखे गट, आमदार शिवाजीराव कर्डिले, शिवाजीराव गाडे, तनपुरे गटाने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, यात तनपुरे गट सपशेल अपयशी ठरला आहे.

 

LEAVE A REPLY

*