अकोले : राजकीय संघर्ष पुन्हा उफळणार

0
अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जनतेतून प्रथमच होत असणारी सरपंचाची निवड त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस च्या तालुक्यावरील वर्चस्वाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बसलेल्या जोरदार धक्क्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काही ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत यापूर्वी मुख्यतः राष्ट्रवादीच्या दोन गटातच राजकीय संघर्ष होत असे आता मात्र राज्यातील तसेच तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थिती मुळे राष्ट्रवादीला मुख्यतः भाजप कडून आव्हान मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेली शिवसेना भाजपाची युती, सभापती – उपसभापती निवडणुकीच्या वेळेस तुटली या निवडणुकीतही अशी युती होण्याची चिन्हे धूसर असल्यामुळे काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
अकोले तालुक्यातील डोंगरगाव, सोमलवाडी, शिळवंडी, लहीत खुर्द, गुहीरे, आंभोळ, मुरशेत, भंडारदरा, चास, वाकी, कोंभाळणे व पैठण या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये काही आदिवासी भागातील तर काही बिगर आदिवासी भागातील आहेत. बिगर आदिवासी भागातील मुळा आणि आढळा खोर्‍यातील ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा-सेना युतीने सहा पैकी चार जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला होता. त्यातही भाजपाने तीन जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. भाजपाच्या तीनही जिप सदस्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. भाजपाच्या सुनिता भांगरे या राजूर गटातून विजयी झाल्या होत्या. या गटातील शेंडी, भंडारदरा, मुरशेत, गुहिरे, वाकी येथे निवडणूका होत आहे.
यातील बहुसंख्य गावात जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व टिकविण्याचे आव्हान भांगरे यांच्यापुढे आहे. देवठाण गटातून भाजपचे जालिंदर वाकचौरे विजयी झाले होते. या गटातील डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे आढळा खोर्‍याचे लक्ष्य लागले आहे. डोंगरगाव मध्ये यापूर्वी राष्ट्रवादी व भाकप मध्ये लढत होत असे समशेरपूर गटातील कोंभाळणे येथेही निवडणूक होत आहे. शिवसेनेच्या एकमेव जिप सदस्या सुषमा दराडे यांच्या गटातील हे गाव आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होत असणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत दराडे पती-पत्नीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मूळा खोर्‍यात डॉ.किरण लहामटे यांनी सातेवाडी गटातून एकतर्फी विजय मिळविला होता. तर कोतुळ गटात राष्ट्रवादीने मोठ्या मताधिक्क्याने विजयश्री खेचून आणली होती. मुळा खोर्‍यात लहीत खुर्द, आंभोळ, चास, शिळवंडी, सोमलवाडी या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहे. यातील कोतुळ गटात चास सारख्या गावात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे मूळा खोर्‍यात सर्वच ठिकाणी जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे.
सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे अनेक ठिकाणी राजकारणाशी संबंध नसणारे पण गावात चांगली प्रतिष्ठा व प्रतिमा असणंरे सुशिक्षित तरुणही सरपंच पदासाठी नशीब अजमावून पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा ताकदवान अपक्षांमुळे राजकीय पक्षांपुढे आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

LEAVE A REPLY

*