ग्रामपंचायत निवडणूक : ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात सर्वांचीच दमछाक

0

पहिल्या दिवशी केवळ चौकशी; एकही अर्ज दाखल नाही, कागदपत्रे जमा
करताना सर्वांच्याच नाकी दम, शौचालय बांधणार्‍यांचे दर वधारले

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या भोकर ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र ऑनलाईन अर्ज कसा दाखल करायचा त्यासाठी व कुठली कागदपत्रे जोडायची या माहितीसाठी इच्छुक उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी काल तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच ग्रामीण भागातील उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करणार आहे. शिवाय पहिल्यांदाच सर्व मतदारांतून सरपंच निवडला जाणार आहे त्यात सरपंचपद अनुसचित जमातीसाठी आरक्षित असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

भोकर ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक अधिकार्‍यांकडून अर्ज न घेता आता अगोदर ऑनलाईन अर्ज दाखल करून त्या अर्जाच्या प्रतीची प्रींट घेऊन ती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करायची आहे. ही प्रत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पोहच केल्यानंतर पुन्हा संबधीत अधिकार्‍याकडून ऑफ लाईन अर्ज दाखल झाल्याची पोहच मिळणार आहे.

या निवडणुकीत उमेदवारांना राष्ट्रीयीकृत बँकेत निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडायचे आहे. तेथेही कामकाज ऑनलाईच असल्याने तेथेही व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय खाते उघडले जात नाही व खाते उघडल्याची प्रत म्हणजे खाते पुस्तीका मिळत नाही. त्याच बरोबर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याचे, जंगम व स्थावर मालमत्ता व अपत्याबाबतचे शपथ पत्र जोडायचे आहे.

मसेच विहीत मुदतीत निवडणूक खर्च सदार करणार असल्याचे हमीपत्र, शौचालय असल्याचा सक्षम अधिकारी यांचा दाखला, ग्रामपंचायत ठेेकेदार नसल्याचा दाखला, उमेदवार सरपंचपदासाठी उमेदवारी करत असल्यास किमान सातवी पास असल्याचा पुरावा, ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचा दाखला या शिवाय उमेदवार आरक्षीत जागेवर उमेदवारी करत असल्यास जातीचा व जात पडताळणीचा दाखला किंवा जातपडताळणीस कागदपत्रे सादर केल्याची पावती व त्यासोबत सहा महिन्यात जात पडताळणी सादर करणार असल्याचे हमी पत्र आदि प्रकारचे कागदपत्रे लागणार आहेत.

अशा परीस्थीतीत जातीचा दाखला काढण्यासाठी उमेदवार अनुसूचित जाती किंवा जमातीचा असल्यास त्यांचा त्या जातीसाठीचा सन 1950 पूर्वीचा पुरावा सादर करावा लागत असल्याने या उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी कसोटी पणाला लागताना दिसत आहे. त्यासाठी संबधित पार्टी व पक्षाला स्वतंत्र टिम उभारण्याची वेळ आली आहे. कारण पुरावे सादरीकरणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातही जात पडताळणी नाशिक येथे असल्याने व त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पत्र व उमेदवार समक्ष लागत असल्याने त्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करावी लागत असल्याचे दिसत आहे.

मिस्तरी लवकर अटोपतं घ्या! थोडेच दिवस राहिलेत! शौचालयाचा दाखला मिळाला पाहिजे!
अनेक गावात अद्यापही अनेक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही. अनेक ग्रामपंचायतींनी सार्वजनीक शौचालयांचा आधार घेत गाव स्वच्छ झाल्याचा आव आणत असले तरी अद्यापही बर्‍याच कुटुंबांकडे वैयक्तीक शौचालय नाही. आजही पहाटेच अनेकजण गावाच्याकडेला किंवा वाड्यावस्त्याच्या रसत्याच्याकडेला गुडमॉर्निंग करताना दिसतात. पण लोकशाही असल्याने आतापर्यंत ढककले पण आता उमेदवारी करायची त्यातच सर्व हुशार झाल्याने तक्रार झाल्यास अडचणी येऊ नये म्हणून प्रत्येकजण दक्षता घेताना दिसत आहे. यापूर्वीच्या काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांकडे अद्यापही वैयक्तीक शौचालय नाही. पण केवळ दाखल्यावर ते सदस्य झालेत पण आता काळ बदललाय. त्यामुळे प्रत्येकजण दक्षता घेताना दिसत आहे. अर्थात अनेक गावात शासनाचे मानधन घेणार्‍या व स्वचछतेचे धडे देणार्‍या अनेकजण यात मागे नाहीत.

यातील काहींकडे अद्यापही वैयक्तीक शौचालय नाही. पण आता निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी वैयक्तीक शौचालय बांधण्याची घाई सुरू केली आहे. काहीकडे गावनेत्यांनीच मटेरीयल पोहोच करण्यास सुरूवात केली तर वाळूच्या टंचाईवर मात करण्यासाठी काहीजण खडीच्या चुर्‍याचा आधार घेताना दिसत आहे. तर काही ठिकाणी गवंडी दादाला दिवसरात्र पाठपुरावा करून शौचालय बांधण्यासाठी आग्रह धरला जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मिस्तरी आटोपतं घ्या हो दिवस फार थोडे दिवस राहिलेत. शौचालय असल्याचा दाखला मिळाला पाहिजे नाहीतर उमेदवारीत अडचण येईल असे म्हणत घाई करण्याची वेळ आल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. या घाईत कधी नव्हे ते गवंडी दादाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्या बरोबर काही ठिकाणी तर या व्यावसायिकांचे भाव वधारले आहेत. पण काही का असेना यानिमित्ताने वैयक्तिक शौचालयांची संख्येत वाढ होऊन सार्वजनिक स्वच्छेतेला हातभार लागणार यात शंकाच नाही.

नेवाशात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही
नेवासा (का. प्रतिनिधी)– नेवासा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या 26 डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक शाखेचे अव्वल कारकून भाऊसाहेब मंडलिक यांनी दिली. नेवासा तालुक्यातील देडगाव, पाचेगाव, करजगाव, पानेगाव, रस्तापूर, कौठा, फत्तेपूर या 7 ग्रामपंचायतींसाठी 7 सरपंच व 75 सदस्यांसाठी अर्ज भरण्यास काल प्रारंभ झाला. उमेदवारांना अर्जासाठी पूर्तता करण्याकरिता कागदपत्रांची करावी लागणारी जमवाजमव तसेच पॅनल निश्‍चिती यामुळे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. शेवटच्या तीन दिवसात अर्जासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*