ग्रामपंचायत निवडणुक निकाल : जिल्ह्यात प्रस्थापितांनी आपापले गड राखले

0
गावागावांतील ‘आमदार’ जाहीर ः काही ठिकाणी उलथापालथ, निम्म्या गावांत महिलाराज

जोर्वेत थोरात गटाचा सरपंच, घुलेवाडीत धक्का
वडाळा बहिरोबात ‘क्रांतिकारी’चा झेंडा
काळेंच्या गावात कोल्हेंचा सरपंच
राजुरीत अपक्ष, साकुरीत दंडवतेंची सत्ता

राहुरीत विखे, कर्डिलेंना मतदारांची साथ
मानोरीत मुस्लिम उमेदवार विजयी
काष्टीत पाचपुतेंची सत्ता, बेलवंडीत शेलारांना, घोगरगावात भोस यांना दणका
अकोलेत पिचड गटाचा डंका

उंबरगावात ससाणेंचा सरपंच, सदस्य मुरकुटे गटाचे
शेवगावात घुले गटाकडे अनेक गावांची सत्ता
नगरमध्ये कर्डिले गट, जामखेडमध्ये भाजप, पारनेरात शिवसेना
श्रीरामपुरात ससाणे यांचे तीन, तर दोन गावांत मुरकुटेंचे सरपंच

नेवाशातील गोधेगाव, पाथर्डीतील तिसगाव, कोळसांगवी, कर्जतमधील अळसुंदे, निंबेत चिठ्ठीद्वारे सरपंच

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 205 पैकी 10 सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. उर्वरित 195 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यपदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये त्या-त्या तालुक्यांत प्रस्थापित नेत्यांना आपापले गड राखण्यात यश मिळविले आहे.
पण काही ठिकाणी मतदारांनी उलथापालथ करून प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे सरपंच एका गटाचा तर सदस्य दुसर्‍या गटाचे निवडून आले आहेत. त्यामुळे जोर्वेसह अनेक ठिकाणी ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती उद्भवली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने निम्म्या गावांत महिलाराज सुरू होत आहे.
संगमनेर तालुक्यात जोर्वेसह बहुतांश गावांत आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाने दणदणीत विजय संपादित केला. पण घुलेवाडीत त्यांना मतदारांनी धक्का देत अपक्षाच्या पारड्यात मते टाकली. विशेष म्हणजे येथे मोठ्या भावाऐवजी मतदारांनी ‘लहान भाऊ लई भारी’ म्हणत सरपंंच केले.
राहाता तालुक्यात अनेक गावांत विखे गटाने वर्चस्व राखले. पण राजुरीत अपक्षाने बाजी मारली. तर साकुरीत यंदा दंडवते गटाला मतदारांनी संधी दिली. राहुरीत विखे, कर्डिले गटाला मतदारांनी पुन्हा पसंती दिली. मानोरीत अपक्ष मुस्लिम उमेदवार ‘दयावान’ निवडून आले. श्रीरामपूर तालुक्यात उंबरगावात ससाणे गटाचा सरपंच झाला. तर अन्य सर्व सदस्य मुरकुटे गटाचे आहेत. असे पहिल्यांदाच घडले.
श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावात पाचपुतेंनी सत्ता राखली असून, बेलवंडी येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार गटाच्या सदस्यपदाच्या सर्व जागा जिंकल्या़ पण सरपंचपदाने हुलकावणी दिली आहे. घोगरगाव येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या गटाला धक्का बसला असून, तेथे राष्ट्रवादीने गड जिंकला आहे.
कोपरगाव तालुक्यात भाजपच्या कोल्हे गटाने सर्वाधिक 13 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे, तर राष्ट्रवादीच्या काळे गटाला 8 ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली आहे़ काँगे्रस व शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येकी 1 ग्रामपंचायत गेली असून, दोन ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे़ माहेगाव देशमुख हे गाव काळेंचे. येथील मतदारांनी कोल्हे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारास पसंती दिली. नेवाशातील वडाळ्यात भाजपाला धक्का देत गडाखांच्या गटाने आपला झेंडा फडकावला.
अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी सात सरपंच माजीमंत्री मधुकरराव पिचड, आ. पिचड यांच्या गटाचे झाले आहेत तर भाजपला तीन तर सेनेला एका सरपच पदावर समाधान मानावे लागले.
शेवगाव 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 8 गावचे सरपंचपद पटकावीत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बाजी मारली असून भाजपने 2 तर स्थानिक आघाडीने 2 गावांचे सरपंचपद पटकावले आहे.
पारनेर तालुक्यात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाच्या ताब्यात 7 ग्रामपंचायती आल्या असून, राष्ट्रवादीकडे 4, काँगे्रस 2 तर इतरांनी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे़ या तालुक्यात राष्ट्रवादीला फटका बसला आहे.
कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या गटाची एक्सप्रेस सुसाट आहे. तीनही ग्रामपंचायतींची सत्ता पुन्हा हस्तगत केली आहे. पाथर्डीतील तिसगाव, कोळसांगवी, आणि कर्जतमधील अळसुंदे, निंबेतील सरपंच पदाच्या उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने येथे चिठ्ठीद्वारे सरपंच निवडण्यात आला. काही ठिकाणी या प्रकाराने नाराजी व्यक्त झाली.

 

LEAVE A REPLY

*