पाथर्डीत दिवाळीअगोदरच लक्ष्मीदर्शनाची चर्चा

0
पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या 109 सदस्य पदांसाठी व सरपंच पदाच्या 11 जागांसाठी शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून लक्ष्मीपुजना अगोदर संबंधित गावांमध्ये सर्वत्र होणारे लक्ष्मीदर्शन निवडणुकीतील चुरस वाढवणारे ठरले आहे.
सर्वच पक्षीय प्रमुख नेत्यांनी मात्र या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. नेत्याशिवाय होणारी निवडणूक बदललेल्या पध्दतीमुळे गावोगावी नेते निर्माण करणारी ठरत आहे. हायटेक, डिजीटल व सोशल मीडियावरिल प्रचारामुळे सर्वच उमेदवार धास्तावले आहेत.
पाथर्डी तालुक्याचे राजकीय विभाजन होऊन पाउण तालुका शेवगाव विधानसभा मतदार संघात तर उर्वरीत तालुका राहुरी मतदार संघात विभागला गेला आमदार मोनिका राजळे व आमदार शिवाजी कर्डिले यांचा संपर्क ग्रामपंचायत निवडणूक माध्यमातून जाहीरपणे नाही.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव तालुक्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. राहुरी मतदारसंघातील आ.कर्डिले विरोधकांना तालुक्यातील गावाची पुरती ओळख नाही.
तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांसाठी 97 उमेदवार तर 109 ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी 250 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. मात्र तालुक्याचे लक्ष तिसगाव,भालगाव कोल्हार व कोरडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर एकवटले आहे.
तिसगावमध्ये तर विधानसभेच्या थाटात निवडणूक रंगली असून राजकीय दहशत वाढल्याने सर्वसामान्य मतदार काहीही बोलत नाहीत. सरपंचांचे अधिकार वाढवून थेट जनतेतून निवडणूक घेण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर तालुक्यात पहिलीच निवडणूक असून सरपंच पदाबाबतच्या निर्णयाने खुद्द उमेदवार खर्चाने हबकून गेले आहेत.
संबंधित गावचा आमदार अशी ओळख नव्या सरपंचाची करून दिली जात असल्याने गावचे कारभारी गावचे आमदारपद आपल्या हातात असावे अशा पारंपारिक विचारातून रिंगणात उतरले आहेत.
भालगावमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, ज्येष्ठ नेते पांडुरंग खेडकर, अंकुश कासुळे कोल्हारमध्ये माजी जि.प. सदस्य मोहन पालवे व माजी पंचायत समिती सभापती संभाजी पालवे यांचा पारंपारिक संघर्ष या निवडणुकीतही शिगेला पोहचला आहे.
भालगाव सरपंचपदासाठी पाच जण लढतील तर सदस्यपदासाठी तेरा जागांसाठी अडोतीसजण संघर्ष करतील. तिसगावमध्ये ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे विरूद्ध त्यांचेच राजकीय शिष्य भाऊसाहेब लोखंडे यांची लढत रंगतदार ठरणार आहे.
वडगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पाचजण निवडणूक रिंगणात आहेत तर सदस्य पदासाठी नऊ जागांसाठी अठरा उमेदवारामधे लढत होईल.
कोरडगाव सरपंच पदासाठी पाचजणांमध्ये लढत होईल तर सदस्य पदासाठी अकरा जागांसाठी तेवीस जण लढणार आहेत. तिसगाव सरपंच पदासाठी पाच जण लढतील तर सदस्यापदासाठी सतरा जागांसाठी एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत.
कोळसांगवी सरपंच पदासाठी चारजण निवडणूक रिंगणात आहेत.सदस्यासाठी चार जागा असून आठजण लढत आहेत. विजय कुसळकर, संतोष पेटारे, संजीव धनवडे या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. मोहरी गावात सरपंच पदासाठी चारजण लढत आहेत.
नऊ सदस्य पदासाठी अठराजण संघर्ष करणार आहेत. निवडुंगा सरपंच पदासाठी सहाजण लढत आहेत. सुवर्णा मरकड बिनविरोध निवडल्या आहेत.दहा जागांसाठी एकोणतीस जण लढत आहेत. कोल्हार सरपंच पदासाठी पाचजण रिगंणात आहेत.
सदस्यपदासाठी ऩऊ जागांसाठी एकोणावीस जण लढत आहेत. सोनोशी येथील सरपंच पदासाठी दोनजण लढत आहेत. गीता दौंड,अलका काकडे, शोभा चौधर,अनिता दौंड, विष्णू दौंड,केशव दौंड, विक्रम ससाणे, सुनीता वाघमारे, बिनविरोध निवडून आले.
सदस्य पदाच्या एका जागेसाठी दोघेजण रिंगणात आहेत. जिरेवाडी येथे सरपंच पदासाठी दोघेज़ण लढत आहेत. सदस्य पदासाठी सुमन आंधळे व संगीता पवळे बिनवरोध निवडून आल्या आहेत. पाच जागांसाठी दहा जण लढणार आहेत.
वैजूबाभुळगाव येथे सरपंच पदासाठी दोघीजणी रिंगणात आहेत. आशाबाई सुरंजे बिनविरोध निवडून आल्या आहेत. सहा जागांसाठी बारा जण लढत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक घराघरांत, भावकीमध्ये, व नात्यागोत्यामध्ये भांडणे लागली आहेत.
मोठ्या कुटुंबामध्ये जास्त मते असलेल्या घरासाठी दिवाळी पॅकेज योजनेची गावपातळीवर चर्चा सुरू असली तरी फुकटचे वैमनस्य नको म्हणून कुणी तक्रार करत नाही. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांपासून विजयी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र मिळणार असल्याने या निवडणुकीला आता चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

LEAVE A REPLY

*