मिनी विधानसभेतही विखे-थोरात संघर्षाचे चित्र

0

तरुणांच्या सहभागाने निवडणुकीने वेधले लक्ष

संगमनेर (प्रतिनिधी)-मिनी विधानसभा म्हणून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेणार्‍या 38 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने सोशलमीडियाच्या माध्यमातून वातावरण निर्माण केले आहे. गावातील प्रतिष्ठेसाठी या निवडणुकीत सक्रियतेने उतरलेल्या तरुणाईने आपली शक्ती प्रचाराच्या माध्यमातून पणाला लावली असून गावा-गावात एकाच पक्षाच्या दोन गटांमध्ये होत असलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत काही अपक्ष आणि बंडखोरांनीही आपले भवितव्य अजमावण्यासाठी बाजी पणाला लावली आहे.
पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे तालुक्यातील सर्वाधिक अशा 38 ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न होत आहे. 38 पैकी शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या गावांपैकी 8 ग्रामपंचायतीचे निवडणूक चित्र संपूर्णपणे राजकीय झाले असून विखे विरुद्ध थोरात या निर्णायक लढती कशा होतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
उर्वरीत ग्रामपंचायतींमध्ये माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना मानणार्‍या दोन गटांमध्येच लढत होत असल्याचे चित्र पहायला मिळते. या दोन्ही गटांबरोबरच गावातील काही अस्वस्थ आणि नाराज झालेल्या गटांनी तिसरा पॅनल उभा करून या निवडणुकीत आपले भवितव्य आजमविण्याचा प्रयत्न केला आहे.
आश्‍वी महसूल मंडळातील जोर्वे, रहिमपूर, कोल्हेवाडी, निमगावजाळी या महत्त्वपूर्ण गावात विखे विरुद्ध थोरात अशा गटांमध्ये लढती होत आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांनी पडद्याआड राहून निवडणुकीचे सर्व सूत्र हलविले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमध्ये झालेला संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने अनुभवला अशीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पहायला मिळत आहे. जाहीर प्रचाराच्या माध्यमातून कुठेही आरोप-प्रत्यारोप नसले तरी सोशल मीडिया आणि पत्रकबाजीने एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचा प्रयत्न या निवडणुकीत पहायला मिळाला.
तालुक्यातील इतर गावांचा विचार केल्यास घुलेवाडी, गुंजाळवाडी, अंभोरे, निमोण, तळेगाव, ओझर, वडझरी, उंबरी बाळापूर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत आहेत. ही सर्व गावे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जातात. निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी तालुक्याच्या नेत्यांची इच्छा होती.
परंतु यंदा थेट जनतेतून सरपंच निवडून देण्याची प्रक्रिया होत असल्याने निवडणुकीत ज्येष्ठांपेक्षा तरुण कार्यकर्ते मोठ्या उमेदीने निवडणूक रिंगणात उतरले आहे. इतर निवडणुकींप्रमाणेच प्रचारात कुठलीही कसूर न ठेवता तरुणाईने राजकीय वातावरण तापवले.
वाड्या-वस्त्यांवर छोट्या-मोठ्या बैठकांमधून एकमेकांची उणीदुणी काढली गेली. मागील पाच वर्षांच्या कारभाराचा पाढा वाचला गेला. यातूनच ग्रामस्थांची करमणूक प्रचारादरम्यान झाली आहे. एक मात्र नक्की की प्रचारात ठोस भूमिका, विकासाचा कार्यक्रम शेवटपर्यंत कुणीही देऊ शकले नाही हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.
तालुक्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या घुलेवाडी गावातच 11 उमेदवार सरपंच पदासाठी उभे आहेत. माघारीनंतर एकमेकांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असला तरी सर्वच उमेदवार प्रचारात सक्रिय राहिल्याने घुलेवाडीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.
गुंजाळवाडीमध्ये उपसभापती नवनाथ आरगडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार केला गेला असला तरी विरोधी गटाने आरगडे यांच्यापुढे निर्माण केलेले आव्हान मोठे आहे. त्यामुळे गुंजाळवाडीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
तळेगाव निमोण गटात थोरात समर्थकांमध्येच लढाई होत असली तरी काही अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरून ठेवल्याने इथल्या सरपंचपदाकरिता होणारी मतविभागणी निर्णायक ठरेल, असे चित्र दिसून येते.
रणजितसिंह देशमुख यांचे गाव असलेल्या अंभोर्‍यामध्ये मोठी लढाई पहायला मिळत आहे. थोरात गटापुढे गावातीलच लोकांनी एकत्रित येऊन पॅनल तयार केले असून अशीच लढाई खराडी, वाघापूर, आणि दोन्ही धांदरफळमध्ये पहायला मिळते. उमेदवारी न दिल्याने नाराजीचा सूर उमेदवारीच्या माध्यमातून अनेक तरुण कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.
साकूर ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणुकीत संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांच्या पत्नी नंदा खेमनर या शेतकरी विकास मंडळाकडून आणि जनसेवा मंडळाकडून ज्योती खेमनर उभ्या आहेत. दोन जागा वगळता उर्वरीत सर्वच जागांवर होत असलेली लढाई साकूर गावाच्यादृष्टीने महत्त्वाची बनली आहे.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या जोर्वे गावात विखे विरुद्ध थोरात असा उघड संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याला पहायला मिळणार आहे. गाव थोरातांचे असले तरी मतदार संघ म्हणून या गावाचे पालकत्व आता विखेंकडे असल्याने इथला संघर्ष ग्रामस्थांच्या भरवशावर निर्णायक ठरणार आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*