आजपासून रणधुमाळी : सरपंचपदासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवार 15 सप्टेंबरपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरवात होत आहे.यंदा पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचपदाची निवड होणार असल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.या निमित्ताने गावगावचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार असून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे
डिसेंबर व नोव्हेंबर महिन्यात एकूण 205 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार 7 सप्टेंबरला निवडणुकीची नोटिस प्रसिध्द करण्यात आली. 15 ते 22 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यत इच्छुकांना उमेदवारी अर्ज पावती तहसील कार्यालयाकडे जमा करता येणार आहे.प्राप्त अर्जाची 25 सप्टेंबरला छाननी होणार आहे. 27 सप्टेंबर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. 27 रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करुन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. 7 ऑक्टोबरला मतदान होणार असून 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून निवडणूकांचा निकाल प्रसिध्द करण्यात येईल.
उमेदारी अर्ज भरताना सर्वसाधारण उमेदवाराला पाचशे व राखीव जागेसाठी शंभर रुपये अनामत रक्कम असणार आहे. दरम्यान अर्जासोबत घोषणापत्र, हमीपत्र व शपथपत्र जोडून द्यावे लागणार आहे.त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याचा दाखला, मालमत्ता व दावित्वे यांचे विवरणपत्र सादर करणे, अपत्यांच्या संख्येबाबत शपथपत्र द्यावे लागणार आहे.उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यापासून 9 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. यंदा प्रथमच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या पदासाठी अनेकांनी गुडख्याला बाशिंग बांधले आहे.

LEAVE A REPLY

*