जवळचे लांब गेल्याने पाचपुते सत्ता राखणार का?

0
लिंपणगाव (वार्ताहर) – गत पाच वर्षांत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या जवळचे कार्यकर्ते लांब गेल्याने काष्टीची निवडणूक अडचणीची ठरू पहात आहे. मात्र विरोधकांत एकी होत नसल्याने याचा फायदा पाचपुते उठविणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावात एकमेकांना शह देण्यासाठी व स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी अनेकांनी कंबर कसली आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गावची ही निवडणूक असल्याने निवडणुकीला महत्त्व आहे. मात्र सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्यामुळे अनेक जणांचा हिरमोड झाला आहे.
गावात ज्येष्ठ नेते शिवराम पाचपुते यांच्या नंतर गावची सत्ता गेली 37 वर्षे माजी मंत्री पाचपुते यांच्या ताब्यात आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत सहकारमहर्षी सेवा संस्थेचे अध्यक्ष भगवानराव पाचपुते, माजी सभापती अरुणराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाचपुते, सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश दांगट हे माजी मंत्री पाचपुते गटाकडे होते.
परंतु आता हे सर्वजण बबनराव पाचपुते यांच्यापासून दूर गेल्याने सत्ता राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे गटाकडे आली आहे. यामुळे गावात पूर्वी नागवडे गटाचे ज्येष्ठ नेते व सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष कैलास पाचपुते, तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे संचालक प्रा. सुनील माने, माजी तालुका अध्यक्ष सचिन कोकाटे यांनी गावात विरोधी भुमिका सांभाळली आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव पाचपुते हे दोन्ही कडून तटस्थ राहिले.
तरी सुध्दा आजपर्यंत ग्रामपंचायत विरोधात गेली नाही. जनतेने संपूर्ण पॅनल माजी मंत्री पाचपुते यांच्या गटाचा निवडून दिला. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. जे पदाधिकारी विश्वासू कार्यकर्ते होते, ते आता बबनराव पाचपुते यांच्या सोबत नसल्यामुळे अडचण होऊ शकते.
कार्यकर्ते विरोधात असल्याने नागवडे गटातील सर्वजण पाचपुतेच्या विरोधात एकत्र येऊन वज्रमुठ बांधून ही निवडणूक एकत्र लढविण्याच्या तयारीत आहेत. पण या सर्वांना एकत्र आणणार कोण? एकत्र आणले तर कोणाचेच कोणाबरोबर पटत नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःला प्रतिष्ठित व मोठा समजतो, त्यामुळे ही निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात पाचवर्षांत घोडधरणा वरून 18 कोटीची पाणी योजना, गावात सिमेंटचे रस्ते, महिला नारिभवन, वाडीवस्तीवरील रस्ते, लाईटची सुविधा, स्मशानभूमी यासह विकास कामांवर भर देत कोणी बरोबर नसले तरी विकास कामावर निवडणूक लढवणार असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते ठामपणे सांगत आहेत.
तर ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असे भगवानराव पाचपुते यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते.
त्यामुळे बबनराव पाचपुते यांना शह देण्यासाठी विरोधक काय शक्कल लढवतात, त्यांना उत्तर देण्यासाठी सदाशिव पाचपुते हे सामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायतीचा गड शाबूत ठेवणार का? पाचपुते खिंडीत कसे सापडतील यासाठी गावात तीन पॅनल उभे करून बदल घडविणार, ही नागवडे गटातील कार्यकर्त्यांची भूमिका आहे का? ंयाकडे सर्वाचे लक्ष लागल्यामुळे गावातील निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.

LEAVE A REPLY

*