देवस्थानच्या जमिनी ग्रामपंचायतींना वर्ग करा

0

संभाजी दहातोंडे : मराठा महासंघाची सहकार मंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील देवस्थानकडे असणार्‍या जमिनी त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात याव्यात अशी मागणी मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. चांदा ता. नेवासा येथील खंडोबा देवस्थानची जमीन चांदा ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्याचा ठराव 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावाची प्रत मुंबईत मंत्री पाटील यांना देण्यात आली. तसेच हा निर्णय नगरसह राज्यात लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असल्याची माहिती दहातोंडे यांनी दिली.
नगरसह राज्यातील देवस्थानांकडे हजारो एकर जमीन पडून आहे. यातील अनेक देवस्थानची परिस्थिती बिकट आहे. देवस्थानच्या जमिनी ग्रामपंचायतींकडे वर्ग केल्यास ग्रामपंचायत सदर जमिनीचा विकास करून त्यातून उत्पन्न निर्माण करू शकेल. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल, याशिवाय देवस्थानचा देखभाल, दुरूस्ती आणि विकासाचा प्रश्‍न मार्गी लागेल. नगरसह राज्यातील अनेक देवस्थानाचा देखभाल दुरूस्तीचा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न या निर्णयामुळे मार्गी लागू शकतो, असे दहातोंडे यांनी मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
याची सुरूवात नेवासा तालुक्यातील चांदा गावातील मार्तंड देवस्थान (खंडोबा देवस्थान) पासून सुरू करण्याची मागणी मंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली. चांदा ग्रामपंचायतीने याबाबत ठराव घेऊन ही जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पाटील यांनी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांकडून याबाबत अहवाल मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीला मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी डौले, शहराध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव रमेश बोरूडे, विभीषण खोसे, शामराव पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*