ग्रामपंचायत निवडणुक निकाल : जिंकला तो आमचा…पडला तो त्यांचा!

0

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर : राजकीय पक्षांच्या तर्‍हा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडून सर्वाधिक सरपंच पद ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. यासाठी दोन्ही पक्षाकडून निवडून आलेल्या सदस्य आणि सरपंच यांच्या आकडेवारीचा खेळ मांडण्यात आला.

मात्र, ही निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली गेली नसल्याने करण्यात आलेल्या दाव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे भाजपकडून पालकमंत्री राम शिंदे यांनी दावा केलेल्या सरपंचाची आकडेवारी आणि त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी दिलेल्या आकडेवारी घोळ असल्याचे समोर आले. या दाव्या प्रतिदाव्यामुळे जिंकला तो आमचा आणि पडला तो त्यांचा अशी तर्‍हा राजकीय पक्षांची दिसून आली.

नोव्हेंबर महिन्यांत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानूसार पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या असून निकाल हाती आले आहेत. यात निवडणुकीत 205 पैकी 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 194 सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत जाहीर झाला आहे.

निकालनंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पत्रक काढत जिल्ह्यात 204 पैकी 108 ठिकाणी भाजप पक्षाला मानणारे कार्यकर्ते सरपंचपदावर विराजमान झाले आहेत. यामुळे या ठिकाणी भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचा दावा केला आहे. यात भाजपने स्वबळावर 164 ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार आणि पॅनल उभे केले होते, तर 40 ठिकाणी विविध स्थानिक आघाड्यामध्ये भाजप सहभागी झाले होते. भाजपला स्वबळावर 164 पैकी 83 जागांवर सरपंच पदाचे उमदेवार विजयी झाले आहेत. तर भाजप पुरस्कृत 40 स्थानिक आघाड्या पैकी 25 ठिकाणी आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे 204 पैकी 108 ठिकाणी भाजपचे सरपंच विजयी झालेले आहेत.

त्यानंतर सायंकाळी उशीरा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी माध्यमांना प्रसिध्द पत्रक पाठवले. यात 195 सरपंचपदाच्या जागांवर 90 ठिकाणी भाजपने यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र, यात पालकमंत्री शिंदे आणि जिल्हाध्यक्ष यांच्या आकडेवारीत विसंगती दिसून आली. शिंदे यांच्या पत्रकात जिल्ह्यातील 1 हजार 608 सदस्यपदांच्या जागांवर 612 ठिकाणी भाजपाचे सदस्य निवडून आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या निकालानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून विरोधी पक्षांनी जीएसटी, नोटा बंदी, भारनियमन अशा अनेक मुद्यावर गावपातळीवर भाजप विरोधात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या पारदर्शक कारभार ग्रामीण जनतेने स्वीकारला असल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी भाजपचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारी जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंचपदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. दोन्ही पक्षाच्या निवडून आलेल्या सरपंचांची संख्या 120 च्या पुढे गेली असल्याचा दावा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या दाव्यानुसार जिल्ह्यात भाजपला केवळ 46 ठिकाणी सरपंचपदांवर उमेदवार निवडून आणता आलेले आहेत. दोन्ही पक्षाच्या आकडेवारीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच कोणाचे निवडून आले? हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

खरे आकडे कोणाचे ….
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात त्यांचे 83 ठिकाणी सरपंच निवडून आले तर पालकमंत्री म्हणतात 90 सरपंच विजयी झाले. तर अवघ्या 46 ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आलेले असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात राष्ट्रवादीचे 61 सरपंच, काँग्रेसचे 68 सरपंच, भाजपचे 46 आणि सेनेचे 18 ठिकाणी सरपंच तर 13 ठिकाणी अन्य सरपंच निवडून आले असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून करण्यात आला आहे.


दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी भाजपचे दावे खोडून काढतांना, जिल्ह्यातील संगमनेर, राहाता व श्रीरामपूर या तीन तालुक्यातच तब्बल 53 सरपंच काँग्रेसचे निवडले असल्याने भाजपच्या दाव्याला फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनीही, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याचा दावा केला. भाजपने त्यांचे सरपंच झालेल्या गावांची व तालुक्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हानही त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

*