मनमाडला डॉक्टर, नर्स मारहाण प्रकरणी तिघांना अटक; मात्र जिल्ह्यात बाह्य रुग्णसेवा बंद

0

मनमाड (प्रतिनिधी) ता. ८ : रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर व नर्सला मारहाण केल्याची घटना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात घडल्या नंतर याचे पडसाद आज मनमाडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उमटून शासकीय हॉस्पिटल व आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे रुग्णाचे प्रचंड हाल होत आहे.

दरम्यान डॉक्टर व नर्सला मारहाण केल्या प्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुमताज शेख या महिलेला जुलाब होत होते. तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र सदर पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यासाठी नातेवाईकांनी आग्रह धरला. पेशंटला दाखल करण्याची गरज नसल्याचे सांगितल्यानंतर पेशंटचे नातेवाईक संतप्त झाले व त्यांनी डॉक्टर संदीप घोंगडे व नर्स श्रीमती आहिरे यांना मारहाण केली.

या प्रकरणी डॉ घोंगडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार मुमताज शेख, बबलू सय्यद व एका अनोळखी इसमा विरुद्ध ३५३,३३२,३३६,यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरांना मारहाण करणे निषेधार्थ आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई देखील केली.

मात्र तरी देखील डॉक्टरांनी संप पुकारून हजारो रुग्णांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

नाशिकमध्येही जिल्हया रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या निषेधार्थ निवेदन दिले.

LEAVE A REPLY

*