Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदृढ निश्‍चय, अनुशासन, कष्ट या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्‍चित – राज्यपाल

दृढ निश्‍चय, अनुशासन, कष्ट या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्‍चित – राज्यपाल

राहुरी विद्यापीठातील 5 हजार 67 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान 

राहुरी विद्यापीठ/राहुरी (तालुका प्रतिनिधी) – जगाच्या नकाशावर भारत देश कृषीप्रधान म्हणून गणला जातो. आपणही ते अभिमानाने सांगतो. तर याच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी पदवी घेऊन जाताना नोकरी मागणार्‍यांमध्ये न राहाता नोकरी देणारे होण्याचा प्रयत्न करून जगाला एक उदाहरण बनण्याचा संकल्प करावा. आपल्या स्वतःच्या भविष्याबरोबरच देशाचे, जगाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केल्यास आपले विद्यार्थी दृढ विश्‍वासावर आकाशाला गवसणी घालतील, कृषी पदवीधरांनी दृढ निश्‍चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्‍चित मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोशयारी यांनी केले.

- Advertisement -

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत पदवीदान समारंभात पदवी प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, कृषीप्रधान देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी आज पदवी प्राप्त करून जात आहेत. देश आपला आहे, पूर्वीच्या काळी परदेशातून आलेल्यांनी हा देश सोन्याची चिडीया असल्याचे ओळखले. मात्र, आपणच हे विसरून पाश्‍चात्यांचे अनुकरण करण्यासाठी धडपडत आहोत. प्राचीन संस्कृतीचे बोट धरून आपण प्रगती केली. गुलामी झुगारून आपण स्वयंपूर्ण बनलो. स्वामी विवेकानंदांनी परदेशात जाऊन संस्कृतीची पताका फडकाविली. आज जग भारताकडे आशेने पहात आहे. त्यामुळे आपला भारत देश पुन्हा जगद्गुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. अशोक फरांदे, सोपान कासार, डॉ. दिलिप पवार, हरिभाऊ जावळे, आ. प्रकाश गजभिये, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सौ. सुनीता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, दत्तात्रय पानसरे, सौ. कीर्ती जमधाडे, डॉ. शरद गडाख, पी.टी. सूर्यवंशी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, आपल्या भारताचा इतिहास हा खूप समृध्द आहे. भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद यांनी जगात भारताचा गौरव वाढविला. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. योगाची संकल्पना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमुल्य अशी भेट आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजून पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपूर्ण असे संशोधन करावे लागेल.

यावेळी भगतसिंह कोशयारी यांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 52 विद्यार्थ्यांना पीएच.डी., 308 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4707 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 5067 पदव्या प्रदान करण्यात आल्या. कोशयारी यांचे हस्ते सन 2018-19 मध्ये बी.एस्स.सी (कृषी) पदवीत प्रथम आलेली कु. मोहीनी अशोक जगताप, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. सकाळच्या सत्रात राज्यपालांनी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट दिली. समारंभाला माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, डॉ. व्यंकट मायंदे, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कृषी संचालक कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक विजय कोते, सुरसिंग पवार, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बापूसाहेब भाकरे आणि डॉ. आनंद सोळंके यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या