Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारआपल्यातच देव शोधा – कोश्यारी

आपल्यातच देव शोधा – कोश्यारी

दत्तक गाव भगदरीत राज्यपालांचा नागरिकांशी संवाद

मोलगी  –

माणसाने आपल्या जवळ राहणार्‍या माणसातच देव शोधावा. देव कधी मद्यप्राशन केलेला पाहिला आहे काय? मग आपणदेखील मद्यप्राशन करु नका. आपल्याला कोणतेही व्यसन असता कामा नये असे सांगत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परिसरातील नागरिकांच्या मनाचा ठाव घेत त्यांच्या मनात स्थान मिळविले. आपल्याच भागातील छोटयाछोटया बाबींचा उल्लेख करत साधेपणाने त्यांनी साधलेला संवाद नागरिकांच्या स्मरणात राहिला.

- Advertisement -

अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी हे गाव राज्यपालांनी सन 2015 मध्ये दत्तक घेतले आहे. या दत्तक गावाला आज श्री.कोश्यारी यांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते जनतेशी संवाद साधतांना बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, जनतेला जनार्दन म्हटले जाते. म्हणजेच देव. परंतू हा देव कधीही दारु पित नाही किंवा गुटखा खात नाही. दारुमुळे कुटूंब उध्वस्त होते. त्यामुळे आपण कोणीही दारु पिवू नये किंवा गुटखा खाऊ नये, असे आवाहन करत सर्वांनी मिळून मिसळून रहावे, असेही त्यांनी सांगितले.

श्री.कोश्यारी पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे तुम्ही दुर्गम, अतिदुर्गम भागात राहतात, तशाच दुर्गम भागात मीदेखील राहतो. मी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालपदापर्यंत पोहचलो. मात्र, आजदेखील मी माझ्या गावी पायीच जातो. तेथील गावकरीही दुरवरुन पाणी आणतात. त्यामुळे आपले दोघांचे दुःख सारखेच आहे. मला या सार्‍या समस्यांची जाण आहे. तुम्हाला पाहून मला माझ्या गावाची व कुटूंबाची आठवण झाली. मुंबईत राहून केवळ मीडीयावर येणार्‍या बातम्यांवर विश्वास न ठेवता आपल्या भेटीला आलो आहे. मी शासकीय विश्रामगृहात न राहता मोलगी येथीलच कोणाच्या तरी घरात मुक्काम करीन. त्याठिकाणी वीज नसली तरी चालेल शौचालय मात्र नक्की असावे. यापुढेही खा.डॉ.हीना गावित व पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना वाडयापाडयात दौरे करायला सांगून तेथील समस्या सोड-विण्यासाठी प्रयत्न करणार, असेही ते म्हणाले.

श्री.कोश्यारी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर बिजली योजनेंतर्गत प्रत्येक घरात वीज पोहचविण्याची योजना राबविली आहे. त्यामुळे बहुतांश घरात वीज पोहचली आहे. मला माहिती आहे आपल्या गावात वीज आहे पण केवळ एक तास वीजपुरवठा मिळतो. यापुढे ही समस्या राहणार नाही. कारण मी येथून गेल्यावर ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्वरीत 132 केव्ही वीज उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावणार. यावेळी त्यांनी संबंधीत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना आदेश करत त्वरीत वीज उपकेंद्र कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. अधिकार्‍यांनी जुनपर्यंत सदर वीज उपकेंद्र कार्यान्वित होईल, असे आश्वासन दिले. जूनपर्यंत वीज उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास राज्यपालांनी वीज अधिकार्‍यांना निलंबीत करण्याचा इशाराही दिला.

श्री.कोश्यारी पुढे म्हणाले, देशात जलजीवन मिशन राबविण्यात येणार आहे. या मिशन अंतर्गत सन 2025 पर्यंत वाडयापाडयात पाणी पोहचून प्रत्येक नळाला पाणी येईल. ते म्हणाले, चहा विकणारा पंतप्रधान झाला, मी लहानपणी वीना चप्पल शाळेत जात होतो. अत्यंत गरीबीतून दिवस काढले असले तरी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपालपदापर्यंत पोहचलो.तुम्ही तर अतीदुर्गम भागात राहतात, त्यामुळे तुमची मुले तर राष्ट्रपती बनतील, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले. यावेळी खा.डॉ.हीना गावित, रामसिंग वसावे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, माजी आ.नरेंद्र पाडवी, जि.प.सभापती रतन पाडवी, अभिजीत पाटील, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या