सरकारी अधिकार्‍यांची सोशलगिरी कर्मचार्‍यांवर बंधनकारक नाही

0

सामान्य प्रशासन विभाग : व्हॉट्सअ‍ॅपवरील आदेश पाळणे बंधनकारक नाहीत

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या प्रशासनात सध्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून बहुतेकवेळा लेखी आदेश न काढता केवळ सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर आदेश दिले जात आहेत. मात्र, सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर दिलेले जाणारे आदेश पाळणे हे सरकारी कर्मचार्‍यांना बंधनकारक नसल्याचा खुलासा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने केला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांत सध्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर कर्मचार्‍यांना आदेश देण्यात येत आहेत. मात्र, अनेक वेळा सरकारी कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या कारणांमुळे हे संदेश मिळू शकत नाही किंवा सतत सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या सोशलगिरीमुळे सरकारी कर्मचारी व शिक्षक त्रस्त झालेले आहेत.

या प्रकारातून अनेकदा सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाईची भाषा सुद्धा करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांना एखादी बैठक घ्यायची असल्यास त्याच्या सूचना सुद्धा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. कर्मचार्‍यांपर्यंत हा संदेश न मिळाल्याने ते बैठकीला गैरहजर असतात.

अशावेळी या कर्मचार्‍यांवर गैरहजेरीची कारवाई होताना दिसत आहे.  यासंदर्भात एका व्यक्तीने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला माहितीच्या अधिकारी याबाबत प्रश्‍न विचारला होता. यात प्रशासनात सोशल मीडिया, व्हॉटसअ‍ॅपवर वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश पाळणे बंधनकारक असल्याचे धोरण अथवा शासन निर्णयाची प्रत असल्यास ती मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे जनमाहिती अधिकारी समृध्दी अनगोळकर यांनी खुलासा केला असून यात सोशल मीडिया, व्हॉटसअ‍ॅपवर वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश पाळण्याचा शासन निर्णय उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे सरकारी कर्मचार्‍यांनी असे आदेश पाळणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

 

LEAVE A REPLY

*