संविधानाची पायमल्ली करणाऱ्या शासनाला खाली खेचा – मोहन प्रकाश

0
नाशिक | देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाच्या आहुती पडल्या आहेत. याच्या अर्कातून आपले संविधान तयार झाले आहे. संविधानाची काही तत्त्वे आहेत. जी भाजप सरकार तोडू पाहता आहे. संविधानाला धक्का म्हणजे सर्वसामान्यांच्या अस्तित्वाला धक्का.

त्यांच्या हक्कावर घाला आहे. ही संविधानाची पायमल्ली असून असे करणार्‍या शासनास सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी येथे केले.

नाशिक शहरात काँग्रेसच्या वतीने आयोजित संविधानदिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भाई नगराळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, आ. निर्मला गावित आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोहन प्रकाश म्हणाले, देशात संविधान हे प्रमुख असून त्यामुळे अठरा पगड जाती गुण्यागोविंदाने राहत आहेत. आज शासकीय कार्यालयांसह निमशासकीय, सहकारी कार्यालयांमध्ये महिला तसेच सर्व उपेक्षित अशा सर्व जाती धर्मातील अधिकारी, कर्मचारी दिसत आहेत. ही संविधानाची देन आहे. परंतु भाजप शासन एक एक आरक्षण रद्द करू पाहत आहे. गरिबांचे, पीडितांचे हक्क त्यांच्यापासून हिसकावले जात आहेत. लाखो तरुण बेरोजगार आहेत. नोकर्‍या गेल्याने त्यांची संख्या वाढत आहे.

हे सरकार अमेरिका, जपानसारख्या विदेशी देशांच्या इशार्‍यावर चालत आहे. नोटबंदीने सर्व देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. जीएसटी लागू करून सर्वांना अडचणीत आणले आहे. जीएसटीमुळे ना देणारा सुखी आहे ना घेणारा ना शासन. सर्वच्या सर्व चिंताग्रस्त आहेत. मेक इन इंडिया म्हणत मोदींनी परदेशी कंपन्यांनाच साद घातली आहे.

तर अतिसंवेदनशील समजल्या जाणार्‍या सुरक्षा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग घेत देशाची सुरक्षितताच धोक्यात आणली आहे. भाजप शासन आल्यापासून देशात एकही असा निर्णय झालेला नाही ज्यातून सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मोदींनी सत्तेवर आल्यापासून भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. परंतु गेल्या चार वर्षांत कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन केलेले नाही. यातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध होते.

देशभरात माजलेल्या आरजकतेला भाजप शासन कराणीभूत आहे. राहुल गांधी सर्व आघाड्यांवर त्यांना तोंड देत आहेत. आता वेळ आली आहे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांना साथ देण्याची. सर्वांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत, शेतकर्‍यांपर्यंत जाऊन त्यांना कोणी वाली आहे, त्यांचे दुःख सावरणारे काँग्रेस आहे याची जाणीव करून देण्याची.

संविधान हे आपले मूळ तत्त्व असून त्याच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची असून यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे विधान परिषदेत गटनेते शरद रणपिसे म्हणाले, देशभरात सव्वाशे कोटी जनता, विविध जाती धर्माचे लोक केवळ राज्यघटनेमुळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. सर्वांना संपत्तीचा समान हक्क आहे. सर्वांना जगण्याचा, बोलण्याचा हक्क आहे. यातून धर्मनिरपेक्षता आवश्यक आहे. परंतु आता ही धर्मनिरपेक्षता कोठे आहे? पुरोगामी विचार व्यक्त करणारे दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या या शासनाचे अपयश आहे.

यावेळी काँगे्रसचे भाई नगराळे, बी. जी. पाटील, आ. निर्मला गावित, विनायक देशमुख, शाहू खैरे, महिला आघाडीच्या शोभा बच्छाव, तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर यांंनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष राजराम पाणगव्हाणे यांनी प्रस्ताविक केले. आभार राहुल दिवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*