Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

सत्तास्थापनेतून भाजपाची माघार, शिवसेनेला निमंत्रण

Share

काँग्रेसचा सत्तेत सहभागी होण्याकडे कल|| ‘महाशिवआघाडी’ होणार|| घडामोडींना वेग

मुंबई – भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला होता. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. त्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना 24 तासांचा अवधी दिला आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वेगवान नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दरम्यान शिवसेना आज सोमवारी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.राज्यपालांकडे दाखल करण्याच्या सत्तास्थापनेच्या दाव्याच्या पत्रावर शिवसेना आमदारांच्या सह्या घेणे सुरू केले होते. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांच्याही सह्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापन करेल तर काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये सरकारमध्ये सहभागी व्हावे असा मानणारा एक गट आहे तर बाहेरून पाठिंबा द्यावा असे म्हणणारा दुसरा गट आहे. पण शिवसेनेने त्यांना सत्तेत सहभागी व्हावे अशी गळ घातल्याचे सांगण्यात येते. त्यावर काँग्रेस नेत्यांनी विचार करत सत्तेत सहभागी होण्यास अनुकुलता दर्शविली आहे. त्यामुळे शिवसेनानेते संजय राऊत आज काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही सोनियांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येते.

जर शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादी, आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तरुण आमदारांच्या दबावापुढे काँग्रेस श्रेष्ठींनी नमते घेतल्याची माहिती पुढे आली आहे. जयपूर येथील बैठकित शिवसेनेला पाठींबा देण्यासाठीच्या पत्रावर काँग्रेस आमदारांच्या सह्या घेण्याचे कामही सुरू झाले आहे.महाशिवआघाडीचे सरकार आल्यास प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तब्बल 18 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर काल अखेर भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जनादेशाचा अनादर करत आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं नाही. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.  शिवसेनेने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी संध्याकाळी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, संख्याबळाअभावी भाजपने हे निमंत्रण नाकारले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत याबद्दल माहिती दिली.

यावेळी त्यांनी म्हटले की, भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप आणि रयत क्रांती अशा महायुतीने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. जनेतेने महायुतीला भरघोस जनादेशही दिला होता. मात्र, शिवसेनेने जनमताचा अनादर करत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने सरकार न स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तत्पूर्वी ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. राज्यातील भाजपा नेतृत्वाला सत्तेचं गणित जुळवण्यात अपयश येत असल्यानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढाकार घेतला. पण त्यांनाही समाधानकारक पर्याय न काढता आला नाही. त्यामुळे त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. अवघ्या अर्ध्या तासाच्या या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि गिरीश महाजन आदी नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळासोबत नव्हते.

शिवसेनेला 7.30 वाजेपर्यंत डेडलाईन

राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या सोमवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यादृष्टीने त्यांना राष्ट्रवारीबरोबरच काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. त्यात त्यांच्या अटी आणि शर्ती राहणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बहुमताचे गणित जुळवावे लागणार आहे. त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी 48 तासांचा अवधी दिला होता. मात्र शिवसेनेला 24 तास देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी 24 तास राज्याची दिशा ठरविणारे आहेत. दरम्यान 24 तासांची मुदत कमी असल्याने ती वाढविण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे.

ठाकरेंचा फोन, पवार सोनियांना भेटणार

सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच आता उद्धव ठाकरे पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग येणार आहे. शरद पवार आज सोनियांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसचे आमदार आज मुंबईत

जयपूर – शिवसेनेला राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर काँग्रेसमध्येही हालचाली सुरू आहेत. काल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात आगामी व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सोनिया गांधींचे खंदे समर्थक अहमद पटेल हेही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आज मुंबईत येणार आहेत. काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना राजस्थान राज्यातील जयपूरमध्ये ठेवले आहे. काल रविवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत सहमती झाली. यावेळी काँग्रेसनेते खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, आज झालेल्या बैठकीबाबत काँग्रेस हायकमांडला माहिती देणार आणि अंतिम निर्णय हा पक्षनेतृत्त्वाचाच असेल.त्यांचे राज्यातील घडामोडींवर आणि राज्यपालांच्या निर्णयावर संपूर्ण लक्ष आहे.

सावंतांना मंत्रिपद सोडावे लागणार

शिवसेनेनं एनडीएसोबत काडीमोड करून भाजपाशी असलेलं नातं तोडावं. केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीनं शिवसेनेला घातली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही मत असेच आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील अवजड उद्योगमंत्री पद सोडण्यास अरविंद सावंतांनी तयारी दर्शविली आहे. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. अरविंद सावंत हे सध्या अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याहीक्षणी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 18 जागा जिंकणार्‍या शिवसेनेला भाजपने केंद्रात केवळ एक मंत्रिपद दिले होते. शिवसेनेने या पदासाठी अरविंद सावंत यांना संधी दिली होती.

राऊत सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी ?

भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला होता. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात आता हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. दुपारी 3 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी ‘काळजी’त !
राज्याच्या विधानसभेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पण भाजपाने सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील वित्त, महसूल, नगरविकास आणि गृह खात्यातील सनदी अधिकार्‍यांचे (आयएएस) धाबे दणाणले आहेत, तर मुख्यमंत्र्याच्या खप्पामर्जीतील सनदी अधिकार्‍यांना आता महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले आहेत.

‘मातोश्री’वर खलबतं
भाजपाने सत्ता स्थापण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर शिवसेनेत घडामोडींना कमालीचा वेग आला. मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेले आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनीटे खलबतं झाली. त्यानंतर दोघेही एका गाडीत ‘मातोश्री’ कडे रवाना झाले. तेथे त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी खा. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. सत्तेची गणितं जुळविण्याबाबत व राज्यपालांसमोर बहुमतासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कसे सादर करायचे, याविषयी बैठकीत खल झाला.

शिवसेनेच्या हालचालींना वेग
भाजपाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपा सत्ता स्थापन करणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत तातडीने मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरल्याने राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा नसल्याने सरकार स्थापन करण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी 56 जागा जिंकून निवडणुकीत दुसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!