Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रडांगी जनावरांच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न : छगन भुजबळ

डांगी जनावरांच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न : छगन भुजबळ

घोटी | प्रतिनिधी

पूर्वी आदिवासी पट्टय़ात एका कुटुंबाकडे कमीत कमी वीस व जास्तीत जास्त शंभरपेक्षा अधिक डांगी जनावरे होती. पुढे अभयारण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्निबध चराईमुळे चारा कमी होऊ लागला. उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावू लागली. परिणामी जनावरांची प्रतिकार क्षमता कमी झाली. त्यानंतर २००० सालाच्या दरम्यान पावसाळ्यात साथीचे रोग येऊन हजारो गाई, बैल, वासरं मृत्युमुखी पडली.

- Advertisement -

राज्यातील आंबित-जानेवाडी- कुमशेत या परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना या साथीचा फार मोठा फटका बसला. त्यामुळे किती तरी शेतकऱ्यांकडे ‘डांगी’ वंश राहिला नाही. डांगी जनावरे झपाटय़ाने कमी होत आहे. त्यासाठी शासन स्तरावर ‘डांगी संवर्धन कार्यक्रम’ राबवून या जनावराच्या संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले.

ग्रामपालिका घोटी बु. व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यांच्या सहकार्यातून आयोजित शेतकी, औद्योगिक, संकरीत व डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन उद्घाटन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आ. हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ, बाजार समितीच्या सभापती इंदूताई मेंगाळ, समाज कल्याण सभापती सुशीला मेंगाळ, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, गोरख बोडखे, कावजी ठाकरे, संदीप गुळवे, विष्णुपंत म्हैसधूने, बाळासाहेब गाढवे, निवृत्ती जाधव यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी जे जे प्रश्न आपल्या समोर मांडले ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने इगतपुरी येथे हिल स्टेशन निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टी निर्माण केली जाणार आहे.

त्याचबरोबर नाशिकमध्ये लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला जाईल. त्यात दोन लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील विशेष योजनेतून कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला जाईल असे सांगत शेतकरी आणि आदिवासी बांधवांची प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपण घेतली असून ती पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आपल्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे नाशिक व अहमदनगर या जिल्ह्य़ांच्या पश्चिम पट्टय़ात डांगी जनावर सर्वदूर प्रसिद्ध आहेत. सह्य़ाद्रीच्या डोंगर रांगामुळे या परिसराला दुर्गमता आलेली आहे. डांगी जनावरांना वर्षभरात पावसाळ्यात व त्यानंतर हिरवा चारा उपलब्ध होतो. चार महिने वगळता उर्वरित काळात अत्यंत कमी दर्जाचा वाळलेला चारा खावा लागतो. जनावरे दररोज ७-८ किलोमीटर चरण्यासाठी फिरतात, डोंगर दऱ्यातील वाटांमुळे थकतात व परिणामी दूध कमी मिळते.

कमी दर्जाच्या चाऱ्यामुळे हाडांची वाढ होत नाही व जनावरे खुजे राहतात. त्यामुळे मूळ भारतीय जनावरांतील धिप्पाड देह व बांधा त्यांना मिळत नाही. पाळीव प्राण्यांच्या विविधतेमध्ये ‘डांगी’ जनावरांची त्या रंगानुसार एकूण आठ प्रकारांची नोंद झाली. मण्यारा, शेवरा, बहाळा, खैरा, तांबडा, पारा, काळा व गवळा असे आठ उपप्रकार आजही आढळतात. या जाती आपल्याला वाचविण्याची प्रयत्न करण्याची गरज आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या वतीने डांगी जनावरांच्या प्रदर्शनासाठी निधी वाढून तो पाच लाखां पर्यंत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या