शासन निर्णयाची प्रत जाळत घरकूल वंचितांनी उकळला मोदी चहा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने घोषित केलेल्या पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने ‘मेरे देश मे, मेरा अपना घर’ आंदोलनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून त्यात शासन निर्णय जाळत, त्याच्यावर मोदी चहा उकळून निषेध नोंदविण्यात आला.
तर उपस्थितांना यावेळी या चहाचे वाटप करून आक्रोश करण्यात आला.
पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने दोन शासन निर्णय काढले. 9 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना आवास योजना राबविण्यासाठी एक रुपया चौरस मीटर भावाने सरकारी जमीन घरकुल वंचितांसाठी महापालिका किंवा नगरपालिका यांना नाममात्र दराने देण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.
तर 3 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान आवास योजना अंमलबजावणी जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असताना, जिल्हाधिकार्‍यांनी ही योजना कार्यान्वित होण्यासाठी व त्याच्या पाठपुराव्यासाठी 6 महिन्यांत एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने ते चुलीत जाळून घरकुल वंचितांनी आक्रोश केला.
या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, शारदा भालेराव, शाहीर कान्हू सुंबे, बाबा शेख, हिराबाई ग्यानप्पा, अंबादास दरेकर, इफ्तेकार कुरेशी, अब्दुल सत्तार, रंजना गायकवाड, अर्चना आढाव, कांता साळवे, सविता बोरुडे, गीता डहाळे आदींसह शहर व उपनगरातील घरकुल वंचित सहभागी झाले.

LEAVE A REPLY

*