Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गोरेवाडीच्या जि.प. शाळेला युनेस्को स्कूल क्लबचे सदस्यत्व

Share
सिन्नर | वार्ताहर  
तालुक्यातील पहिली टॅब स्कूल ठरलेल्या गोरेवाडी (सायाळे) येथील जिल्हा परिषद शाळेला युनेस्कोने आंतरराष्ट्रीय स्कूल क्लबचे सदस्यत्व नुकतेच बहाल केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक शिक्षण पद्धतीचा अध्यापनात अवलंब करता येणार गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे.
 आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युनेस्को या संस्थेकडून जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक उपक्रमांचे आदान प्रदान करून त्यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी उपक्रम राबवले जातात. युनेस्कोचे सभासदत्व असणाऱ्या प्रत्येक देशात यासाठी संस्थेकडून स्वतंत्र यंत्रणा असून त्या-त्या देशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून उपक्रम सुचवले जातात.
तालुक्यातील ठाकरवाडी व निमगाव सिन्नर येथील शाळांना यापूर्वीच युनेस्को स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून गेल्या आठवड्यात गोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला हा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे युनोस्को स्कूल क्लबचे सदस्यत्व मिळवणारी  ही तालुक्यातील तिसरी शाळा ठरली आहे.
सिन्नरच्या पूर्वेकडील शेवटचे टोक असणाऱ्या गोरेवाडी येथील शाळेची पटसंख्या 21 इतकी असून तेथील विद्यार्थ्यांना मोबाईल टॅबद्वारे अध्यापन करण्यात येते. असा उपक्रम राबविणारी ही तालुक्यातील एकमेव शाळा आहे. डिजिटल शाळा म्हणूनही ही शाळा परिचित आहे. टॅबच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम व त्यासंबंधी असणारे अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाऊनलोड करून विद्यार्थी त्यांचा सुलभतेने वापर करतात. या उपक्रमामुळे येथील विद्यार्थ्यांची गुणात्मक पातळी देखील उंचावली आहे.
विद्यार्थ्यांना आता युनेस्को स्कुल क्लबमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक आदान-प्रदानच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.  युनेस्कोच्या दिल्ली येथील राष्ट्रीय केंद्राकडून शाळेला स्कूल क्लबच्या सदस्यत्वाचे प्रमाणपत्र नुकतेच मिळाले असून स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात मुख्याध्यापिका सुनिता सोनवणे, उपक्रमशील शिक्षक उमेश खेडकर यांनी हे प्रमाणपत्र ग्रामस्थांच्या सुपूर्द केले. सायाळेचे उपसरपंच शिवराम गोरे, शालेय समिती अध्यक्ष गुलाब गोरे, आण्णा गोरे, मच्छिंद्र गोरे, गौतम गोरे, अजय गोरे यांचेसह पालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवनाथ निर्मळ विस्तार अधिकारी दिलीप पवार यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून शैक्षणिक बदलांची सैर घडवणे शक्य होणार आहे. याशिवाय युनेस्को क्लबच्या सदस्य शाळांसाठी असणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय प्रदर्शनांमध्ये देखील सहभाग नोंदवता येणार आहे. शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी देखील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांचे यूनेस्को मार्फत आयोजन करण्यात येते. त्यातून प्रचलित शिक्षणपद्धती सोबतच अत्याधुनिक पद्धतीने अध्यापनाचे धडे देणे  शक्य होणार आहे अशी माहिती शिक्षक खेडकर यांनी दिली.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!