गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांवर श्रीगोंद्यात हल्ला

0

12 जण जखमी; जनावरे पकडून दिल्याच्या रागातून राडा

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील दौंड-नगर रस्त्यावरील हॉटेल तिरंगा जवळ एका टेम्पो मधून 12 जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना पुण्यातील अखिल भारतीय गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी ती पकडून दिल्याच्या रागातून 50 ते 60 जणांच्या जमावाने गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केेला.

विशेष म्हणजे हा प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोरच घडला. यामध्ये सुमारे 12 जण जखमी झाले आहेत. गोवंशाची वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणीचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दर शनिवारी जनावरांचा आठवडे बाजार भरतो. या बाजारात राज्यातून अनेक जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. याच बाजारातून कत्तल करण्यासाठीही जनावरे नेली जातात. याबाबतची माहिती पुणे येथील अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी दौंड रस्त्यावरून जनावरे घेऊन जाणारा टेम्पो (एमएच 16, येवाय 5986) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

या टेम्पोमधील 10 गावरान बैल, 2 जर्सी गायी अशी एकूण 12 जनावरे ताब्यात घेत पोलिसांनी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांच्या फिर्यादीवरून आरोपी टेम्पो मालक वाहिद शेख, चालक राजू फतरू शेख (रा. हमालवाडा, झेंडीगेट, अहमदनगर) यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या घटनेनंतर अखिल भारतीय गो-रक्षक समितीचे कार्यकर्ते शिवशंकर राजेंद्र स्वामी, प्रतीक गायकवाड, नितीन देशमुख, निखिल झरांडे, ओमकार मानकर, केतन बासूदकर, उपेंद्र बलकवडे, सचिन जवळके, तुषार कदम, देवेंद्र अत्रे, मंगेश नडे, विलास पोल हे पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर जात असताना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास 50 ते 60 जणांचा जमावाने त्यांच्यावर दगडांचा मारा केला.

यामध्ये गो-रक्षक समितीचे वरील 12 जण जखमी झालेले आहेत.जखमींमधील काहींच्या डोक्याला, हाताला, डोळ्याला, पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

LEAVE A REPLY

*