B’day Spl : मधुबालाच्या जयंतीनिमित्त गुगलचं स्पेशल डुडल

0

मुंबई : बॉलिवूडची दिग्गज दिवंगत अभिनेत्री आणि एकेकाळी लाखो-करोडो हृदयांची धडधड बनलेल्या मधुबाला हिचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीत झाला होता. १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा होत असला तरी मधुबाला यांना ‘हृदया’नंच दगा दिला, असं म्हणायला हरकत नाही.

‘बॉलिवूडची मर्लिन मन्रो’, ‘ब्युटी विथ ट्रॅजडी’ म्हणूनही मधुबालाचा उल्लेख केला जातो. याच मधुबाला यांच्या जन्मदिवसानिमित्तानं गूगलनंही त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. आजच्या दिवशी गुगलनं एक खास डुडल बनवून मधुबालाला आगळ्यावेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. गुगलने मधुबालाचे नृत्य करीत असलेलं खास डुडल बनवलंय. मधुबालानं ‘बसंत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

‘नीलकमल’ या चित्रपटात मधुबाला मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. या चित्रपटानंतर मधुबालाला ‘सौंदर्याची राणी’ या नावानं ओळखलं जावू लागलं. मधुबालानं केवळ चित्रपटसृष्टीवर राज्य केलं नाही तर तिनं अनेकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणताच सर्वात आधी मधुबालाचं नाव समोर येतं. लाखो दिलांची धडकन म्हणून ती आजही ओळखली जातेय.

रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या मधुबालाचे खासगी आयुष्यही अनेक गोष्टीने रंगलेले आहे. लहान असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये लहान मुलांसाठी असलेल्या एका कार्यक्रमात संगीतकार मदनमोहन यांच्या वडिलांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना बॉम्बे टॉकीजचा चित्रपट ‘बसंत’मध्ये बालकलाकाराची भूमिका दिली. ‘बसंत’पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुढे अजरामर होत गेला.

वयाच्या ३६ व्या वर्षी मधुबालाचं निधन…

२३ फेब्रुवारी १९६९ रोजी अवघ्या ३६ व्या वर्षी मधुबालाचं निधन झालं. मधुबालाला हृदयाचा त्रास होता. अनेकदा चित्रपटाच्या सेटवर तिची प्रकृती बिघडायची. उपचारासाठी ती लंडनला गेली. परंतु, सर्जरी करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. शस्त्रक्रिया करताना तिचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. मधुबालाच्या निधनानंतर दोन वर्षानंतर तिचा १९७१ साली ‘जलवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

LEAVE A REPLY

*