शिक्षक पात्रता परीक्षेसाठी चांगला प्रतिसाद

0
गणोरे (वार्ताहर) – राज्यात सुमारे पंधरा हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा अहवाल शासनाने जाहीर केल्याने यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरणे व खाजगी अनुदानित जागेवरती देखील शासनच शिक्षक नियुक्त करणार असल्याने अनेक शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविकाधारक शिक्षक पात्रता परीक्षा देऊन आपले भविष्य अजमावू पहात आहेत.
राज्यात शिक्षण हक्क कायदा अस्तीत्वात आल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती करण्यात आली. त्यामुळे सन 2010 नंतर शिक्षकांची भरती करताना सदरची परीक्षा उत्तीर्ण होण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने गत तीन वर्षे सातत्याने या परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून दिली आहे. त्यात यावर्षी राज्यात सुमारे पंधरा हजारपेक्षा अधिक शिक्षक पदे रिक्त असल्याचे शासनाने सांगितले आहे. सदरची पदे लवकरच भरली जातील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर राज्यातील खाजगी अऩुदानित शाळामंध्ये भरती होणारे शिक्षक यापुढे शासन भरणार असल्याचा शासननिर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षक भरतीच राज्यसरकारच्या हाती गेली आहे. असा परीस्थितीत नोकरीची आशा निर्माण झाल्याने यावर्षी पात्रता परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.
राज्यात 2013 ला इयत्ता पहिली ते पाचवीकरिता शिकविण्यास पात्र असलेल्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या 3 लाख 67 हजार 896 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 16281 विद्यार्थी पात्र झाले होते. एकूण निकाल 4.43 टक्के लागला होता. तर 2014 मध्ये 2 लाख 60 हजार 629 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 2563 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावेळी उर्दू माध्यमांचा निकाल चक्क 0 टक्के लागला होता. एकूण निकाल 1.04 टक्के लागला होता. 2016 ला घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेत 1 लाख 40 हजार 574 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1880 विद्यार्थी पात्र ठरले होते.
तर सहावी ते आठवीकरिता लागणार्‍या शिक्षकाकरिता असणार्‍या पात्रता परीक्षेत 2013 ला 2 लाख 24 हजार 94 विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी 14 हजार 787 पात्र ठरले. पुढील वर्षी 1 लाख 54 हजार 201 विद्यार्थ्यापैकी 7 हजार 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल शेकडा 4.92 टक्के होता. मागील वर्षी 1 लाख 35 हजार 460 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 7 हजार 78 विद्यार्थी पात्र ठरले होते. राज्यात प्राथमिक साठी सुमारे वीस हजार तर उच्च प्राथमिकसाठी सुमारे 29 हजार विद्यार्थी पात्र आहेत.
सदरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केवळ सात वर्षापुरतेच पात्र धरले जातात.त्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेले सर्वच छात्र अध्यापक विद्यार्थी भरती प्रक्रीयेला पात्र समजली जाणार आहे.यावर्षी भरती प्रक्रीया होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पात्रता परीक्षेस विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.

गैरप्रकारास आळा बसण्यासाठी परीक्षा परीषद पेन पुरविणार गैरप्रकारास आळा बसण्यासाठी परीक्षा परीषद पेन पुरविणार  शिक्षक पात्रता परीक्षेत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्यावतीने उत्तर पत्रिका लिहिण्याकरिता परीक्षा परिषदच पेन पुरविणार असल्याचे समजते. याबाबत परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांच्याशी संपर्क साधला असता.त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.त्यामुळे या नव्या धोरणांचा परीणाम होऊन गैरप्रकारास आळा बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*