Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नरकरांसाठी गुड न्यूज; बाधित रुग्णांच्या निकटवर्तीयांचे १२ अहवाल निगेटिव्ह

सिन्नरकरांसाठी गुड न्यूज; बाधित रुग्णांच्या निकटवर्तीयांचे १२ अहवाल निगेटिव्ह

सिन्नर | विलास पाटील

सिन्नर शहरातील डूबेरे नाक्याजवळील खासगी रुग्णालयात सहायक डॉक्टर बाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीला पाठविले होते. आज हे सर्व १२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आल्यामुळे सिन्नरसह पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

- Advertisement -

यासोबत सिन्नर शहरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या जवळ स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयिताचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरीकडे याआधी येवला कनेक्शन असलेल्या संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सिन्नरवर घोंगावणारे संकट काही प्रमाणात दूर झाल्याचे चित्र आहे.

गुरुवारी खासगी रुग्णालयातील डॉक्टर बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाने डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १२ संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले होते. आज हे सर्व अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.

त्याशिवाय येवल्याशी कनेक्शन असलेल्या ८ संशयितांचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील संकट तूर्तास टळले असले तरीदेखील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

नाशिकला तपासणीसाठी पाठवलेले अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने हे सर्व नमुने पुण्यात पाठवण्यात आले होते. आता फक्त नाशिक शहरात मृत पावलेल्या पत्नीच्या अंतिम विधीस हजर राहिलेल्या पतीसह तिघांचे अहवाल येणे बाकी आहेत. तसेच तालुक्यात एकूण सहाच रुग्ण असून त्यांच्या प्रकृती वरील धोकाही टळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील चौघांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात तर दोघांवर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत,

- Advertisment -

ताज्या बातम्या