Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकखुशखबर : नाशिकमध्ये दररोज होणार ५०० नमुन्यांची तपासणी; अहवाल प्रलंबित राहणार नाहीत

खुशखबर : नाशिकमध्ये दररोज होणार ५०० नमुन्यांची तपासणी; अहवाल प्रलंबित राहणार नाहीत

नाशिक । प्रतिनिधी 

करोनाच्या प्रलंबित अहवालांमुळे उपचारांनाही उशीर होत असल्याने रूग्ण दगावत चालले आहेत. यावर उपाय म्हणुन जिल्हा आरोग्य विभागाने धुळे येथील प्रयोग शाळेस अनुदान देत दररोज 300 अहवाल देण्याचे लक्ष दिले आहे. तर नाशिक शहरातील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत 200 असे दररोज 500 स्वॅब नमुन्यांचे अहवाल आता प्राप्त होणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात करोना विषाणु पसरण्याचा वेग प्रचंढ वाढला असून दर दिवशी दिडशे ते दोनशे संशयित रूग्ण दाखल होत आहेत. याचा प्रंचड ताण करोनाची चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांवर येत असून अहवाल प्रलबित रहाण्याचे प्रमाण मोठे आहे. दोन दिवसात जिल्ह्यातील 600 स्वॅबचे अहवाल प्रलंबित होते. एकिकडे दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत असताना अहवाल लवकर प्राप्त होत नसल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली होती.

तर संशयावरून कोरोंटाईन केलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना आठ आठ दिवस अहवालाची प्रतिक्षा करत करोना ग्रस्तांच्या सानीध्यात रहावे लागत होते. यातून अशा संशयितांना करोना होण्याची भिती मोठ्या प्रमाणात वाटत होती. तसेच अहवालांना उशिर होत असल्याने प्रत्यक्ष दाखल संशयितांवर काय उपचार करायचे याबाबत निश्चितता येत नव्हती. यामुळे प्रलबंबित अहवालांचा प्रश्न घहन बनला होता.

जिल्हा अरोग्य यंत्रणेकडून प्रारंभी पुणे येथील प्रयोग शाळेत स्वॅब पाठवण्यात येत होते. तेथे वाढता इतर जिल्ह्यांचा ताण पाहता नाशिकचे अहवाल प्रलंबित राहत होते. अखेर पाठपुरावा करून पुण्यातील मिलिटरी रूग्णालयातील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले. याही ठिकाणी विलंब होण्यास सुरूवात झाली. दरम्यान आरोग्य विभागाच्या पाठपुराव्याने विभागांमध्ये एक एक प्रयोगशाळा शासनाने दिली.

नाशिकसाठी धुळ्याची प्रयोगशाळा मिळाली. परंतु येथील अपुर्ण साधनांमुळे पुन्हा नाशिकच्या प्रलंबित अहवालांचा प्रश्न निर्माण झाला. अखेर पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर पाठपुरावा करून येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोग शाळेस मंजुरी मिळवत विक्रमी वेळेत ती सुरू केली.

मात्र, या ठिकाणी एका दिवसात 180 स्वॅब तपासण्याची यंत्रणा आहे. तर दुसरीकडे करोना संशयितांची रोज दोनशे ते तीनशेने भर पडत असल्याने पुन्हा प्रलंबित अहवालांचा प्रश्न निर्माण झाला.

धुळे येथील क्षमता वाढल्याने नाशिक जिल्हा आरोग्य यंत्रणेने 5 हजार अहवाल तपासणीचे अनुदान देऊन दररोज 300 अहवाल तपासून देण्याचे लक्ष या प्रयोग शाळेस दिले आहे. यामुळे आता नाशिकचे रोज 500 स्वॅब तपासून त्याचे अहवाल येणार आहेत. परिणामी उपचार लवकर मिळण्यास व करोनास अटकाव करण्यास सोपे होणार आहे.

पाच दिवसात स्वॅब निष्क्रिय

करोनाचा स्वॅब हा सर्वसामान्य तापमानात 5 दिवस टिकतो. एखाद्या रूग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर त्याची पाच दिवसात तपासणी होणे आवश्यक असते. मात्र, फ्रीजमध्ये हे स्वॅब अधिक दिवस चांगले राहतात. त्यानुसार बर्फ असलेल्या बॉक्समधूनच स्वॅब प्रयोगशाळेत पाठवले जातात. जर अधिक दिवस झाले तर स्वॅबचे नमुने निष्क्रिय होतात. तसे आढळल्यास प्रयोगशाळेतून पुन्हा सदर रूग्णाच्या स्वॅबची मागणी होते असे तज्ञांनी स्पष्ट केले.

प्रलंबीत अहवाल काढले

नाशिक जिल्ह्यातील स्वॅब तपासण्याची यंत्रणेच्या तुलनेत दररोज दाखल होणार्‍या संशयितांची संख्या अधिक असल्याने अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत होते. परंतु या दोन दिवसात मुंबई, औरंगाबाद, नागपुर, पुणे अशा सर्व प्रयोगशाळांमध्ये स्वॅब पाठवून अहवाल प्राप्त केले आहेत. यातून आतापर्यंत प्रलंबीत असलेले सर्व चाचण्या पुर्ण केल्या आहेत. तर आता दररोज 500 तपासण्या होणार असल्याने अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाण कमी होईल.

– डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

- Advertisment -

ताज्या बातम्या