Friday, April 26, 2024
Homeनगरलग्न समारंभातून 17 तोळे सोने असलेली पर्स लांबविली

लग्न समारंभातून 17 तोळे सोने असलेली पर्स लांबविली

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता शहरातील कुंदन लॉनमध्ये लग्न समारंभातून 17 तोळे सोने व 10 हजार रोख असा सात लाख रूपये किमतीचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये घडली. श्रीरामपूर येथील उद्योजक मुळे यांच्या कुटुंबातील विवाहासाठी डॉ. मंजुषा नरेंद्र कुलकर्णी, नंदिग्राम कॉलिनी, औरंगाबाद या आल्या होत्या. त्या विवाहस्थळी खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांच्या बहीणीने ग्रे रंगाची पर्स त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिली होती. त्यांनी ती शेजारील मोकळ्या खुर्चीवर हातातील पर्स ठेवली व नातेवाईकांशी बोलत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स पळवून नेली.

- Advertisement -

या पर्समध्ये दोन राणी हार व दोन कानातले जोड वजन साडेतीन तोळे, साखळी मनी व पदक वजन 7 तोळे, नेकलेस, चार बांगड्या, दोन अंगठ्या, एक ब्रासलेट, सॅमसन कंपनीचे दोन मोबाईल, एटीएम, पावर बँक, असे सर्व साहीत्य 17 तोळे सोने व 10 हजार रूपये रोख असा सुमारे सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

याप्रकरणी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कुंदन लॉन्समधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता एक संशयित तरुण हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता शहरातील मंगल कार्यालयात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या तसेच बाहेर गर्दीत गंठन चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या