Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सोने चाळीस हजारी; जागतिक मंदीत सोन्याला झळाळी

Share
नाशिक । प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वेगाने  वाढ होत आहे. शुक्रवारी दि.२९ बाजारात सोन्याच्या दराने  उच्चांकी पातळी गाठली होती. यादिवशी दिल्लीत ३९ हजार ५०० रुपये इतका दर राहिला. तर दहा ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा दर या दिवशी नाशिकमध्ये तोळ्याला ३८ हजार ९६० रुपये इतका होता. आज दि.३१ मात्र  हे भाव ३०० रुपयांनी खाली येत ३८ हजार ६०० रुपये इतके राहिले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आर्थिक बदलांचा थेट परिणाम भारतातील सुवर्ण बाजारावर देखील बघायला मिळतो आहे. गणपतीचा सण तोंडावर असताना जीएसटी आकरणीसह सोन्याचे दर चाळीस हजारावर पोहोचले असून मुंबई, नाशिक मध्ये ३०० रुपये घसरण होऊन सोन्याचे भाव काहीसे खाली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाल्यानं सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा देखील हा परिणाम मानला जात आहे. गेल्या महिन्यात दि.१ जुलै रोजी ३४ हजार २०० रुपये असणारा भाव महिना अखेरीस दि.३१ जुलै रोजी ३५ हजार ५० रुपयांवर आला.
या महिन्यात दि. १९ जुलै रोजी ३५ हजार ४०० रुपये इतका उच्चांकी भाव सोन्याचा राहिला होता. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याचा भाव वधारला असल्याचे चित्र आहे.
दि. २० ऑगस्ट रोजी ३७ हजार ६०० रुपये असणारा भाव दि. २४ ऑगस्ट रोजी एक हजार रुपयांनी उसळी मारून ३८ हजार ६०० रुपयांवर पोहोचला. त्यानंतर दि. २९ ऑगस्ट रोजी ३८ हजार ९५० वर भाव स्थिरावले. आज त्यात पुन्हा ३०० रुपयांची घसरण बघायला मिळाली. सोन्यापाठोपाठ चांदी देखील वधारली असून ५० हजार रुपये प्रतिकिलो च्या घरात पोहोचली आहे.
का वाढले सोन्याचे भाव ?
तज्ञांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे  प्रमाण वाढले  आहे. अमेरिकेने गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हा जेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात असा ट्रेंड आहे. आता तेच चित्र पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेच्या अहवालात जागतिक स्तरावर आर्थिक वाढ खुंटल्याचं नमूद केलं आहे.
त्यामुळे लोक सोन्यामधल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत. रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगभरातल्या देशांच्या केंद्रीय बँका देखील पुढच्या काही महिन्यांत 374 मेट्रिक टन सोन्याची खरेदी करतील असा अंदाज आहे. आरबीआयने मार्च 2018 पासून आतापर्यंत 60 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलांचा परिणाम देशातील स्थानिक बाजारात होण्याची शक्यता आहे. या आठवड्यातच सोने  40 हजारांच्या पुढे जाऊ शकते. जर आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणखी बदलले तर येत्या 2 ते 3 आठवड्यात सोन्याच्या दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धाचा जगालाच फटका बसला आहे.
जागतिक स्तरावर व्यापार मंदावला असल्यामुळे आशियाई देशातले चलन कमकुवत झाले आहे. अमेरिका आणि इराणमध्येही तणाव निर्माण झाला असल्याने अशा परिस्थितीत लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. नाशिकच्या बाजाराबद्दल बोलायचे झाले तर सध्या शांतता आहे. गणपतीपासून खरेदीची सुरुवात होईल. सध्याचे भाव स्थिर राहिले तर येणाऱ्या लग्नसराईत आणखी वाढ बघायला मिळू शकते.
मयूर शहाणे, संचालक – मयूर अलंकार
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!