Blog : गोखले एज्युकेशन सोसायटीचा ज्ञानयज्ञ; डॉ. महेश औटी यांचा ब्लॉग

0
शिक्षणक्षेत्रात ‘ज्ञान प्राप्तिस्तु भक्तितः’ हे ब्रीद उराशी बाळगून कर्तृत्वाचा उत्तुंग ठसा उमटविलेली गोखले एज्युकेशन सोसायटी दि.19 फेब्रुवारी 2018 रोजी 101 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शतकमहोत्सवानिमित्ताने देशातील या अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या दैदीप्यमान कामगिरीवर टाकलेला हा प्रकाशझोत…

संस्थेची स्थापना : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु थोर देशभक्त व समाजसुधारक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांनी व कार्याने प्रभावित झालेले एक ध्येयप्रेरित शिक्षक – त्र्यंबक अप्पाजी तथा टी. ए. कुलकर्णी. नामदार गोखलेंविषयीच्या अंतःकरणातील आस्था व श्रद्धेतून त्यांच्या नामाभिधानाने शिक्षण संस्था स्थापन करावी, या विचाराने प्रेरित झालेल्या टी. ए. कुलकर्णींनी नामदार गोखलेंकडे हा विचार बोलून दाखविला.

नामदारांनी हयातीत आपल्या नावाने संस्था स्थापन करण्यास संमती दिली नाही. दि.19 फेब्रुवारी 1915 रोजी नामदार गोखले निवर्तले. त्यांच्या तृतीय स्मृतीदिनी म्हणजेच दि.19 फेब्रुवारी 1918 रोजी प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांनी ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था मुंबई येथे स्थापन केली आणि ज्ञानयज्ञ प्रदीप्त करुन शिक्षणक्षेत्रातील एका दमदार वाटचालीचा श्रीगणेशा केला.

सुरुवातीच्या शाळा : 1912 साली प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांनी स्थापन केलेली शाळा – डी. जी. टी. हायस्कूल संस्थेस समर्पित केले. परळ, लालबाग, चिंचपोकळी या भागातील गिरणी कामगार व मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी 1919 मध्ये परळ येथे आर. एम. भट हायस्कूल स्थापन केले. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी हे छोटेसे गांव. येथील तसेच आजुबाजूच्या वाड्या वस्त्यांवरील आदिवासींच्या शिक्षणासाठी 1920 मध्ये एस. पी. एच. हायस्कूलची बोर्डी येथे स्थापना केली. या शाळा अल्पावधीतच नावारुपाला आल्या. त्यामुळे संस्थेने महाविद्यालय काढून उच्चशिक्षणामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.

उत्तर महाराष्ट्रात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ : त्या काळात उच्च शिक्षणाची सोय मुंबई – पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्येच होती. उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर म्हणून संस्थेने नाशिकची निवड केली. मोठ्या प्रयत्नांतून संस्थेने दि.20 जून 1924 रोजी नाशिक येथे एच. पी. टी. महाविद्यालय सुरु केले आणि उत्तर महाराष्ट्रात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला महाविद्यालयात कला विद्याशाखेचे शिक्षण दिले जात असे. सन 1948 मध्ये एच. पी. टी. महाविद्यालयात विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करण्यात आले.

संस्थेची महाविद्यालये : जून 1957 मध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र वाणिज्य महाविद्यालय – बी. वाय. के. कॉलेज ऑफ कॉमर्सची नाशिकला स्थापना केली. नाशिकरोड, देवळाली, भगूर आणि आजुबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाच्या सोयीसाठी जून 1963 मध्ये आर. एन. सी. आर्टस्, जे. डी. बी. कॉमर्स अ‍ॅण्ड एन. एस. सी. सायन्स कॉलेज नाशिकरोडला स्थापन केले.

प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांच्या पुढाकाराने बी. वाय. के. महाविद्यालयात एम. बी. ए. चा अभ्यासक्रम 1968 मध्ये सुरु करुन विद्यापीठीय व्यवस्थापन शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली. 1969 मध्ये नाशिकला न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय तसेच संगमनेरला शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरु केले. 1975 मध्ये देशातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्राची कोसबाड, जि. ठाणे येथे स्थापना केली. 1984 मध्ये महाराष्ट्रातील पहिले रात्र महाविद्यालय परळला काढले. 1985 मध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय – एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के. महिला महाविद्यालय स्थापन केले.

संख्यात्मक विस्तार : संस्थेने बोरिवली, जव्हार, बोर्डी, ओझर मिग तसेच श्रीवर्धन या ठिकाणी महाविद्यालयांची स्थापना करुन स्थानिक विद्यार्थ्यांचा उच्चशिक्षणातील सहभाग वाढविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. स्थल, काल व परिस्थितीनुरुप गरजेनूसार संगणकशास्त्र, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, तंत्रनिकेतन यासारख्या विद्याशाखांतर्गत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करुन शिक्षणक्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. आज गोखले एज्युकेशन सोसायटी तीन विभागातील (नाशिक, मुंबई व पालघर) पाच जिल्हे (नाशिक, मुंबई, पालघर, रायगड व अहमदनगर) 17 केंद्रांमध्ये कार्यरत असून 123 संस्था चालवित आहे. संस्थेत आज जवळपास 3,000 शिक्षक कार्यरत असून एक लाखाहून अधिक विद्यार्थी आपले उज्वल भवितव्य घडवित आहेत. संस्था संख्यात्मक विस्तार करीत असतांनाच गुणात्मक विकासही मोठ्या कौशल्याने साधत आहे.

उपक्रमशील व प्रेरणादायी वातावरण : ‘शिक्षकांनी विद्यार्थी व शिक्षकांसाठी चालविलेली शिक्षणसंस्था’ हे गोखले एज्युकेशन सोसायटीचे ठळक वैशिष्ट्य आहे. मुल्याधिष्ठित गुणवत्तापूर्ण शिक्षणातून जागतिक दर्जाचे नागरिक घडविणे, विद्यार्थ्यांमध्ये क्षमतांचे उन्नयन करणे आणि शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा उंचविणे ही उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून संस्था गेल्या 100 वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात अत्यंत तळमळीने, निष्ठेने व श्रद्धेने कार्य करीत आहे.

गुणवत्तेची कास व उत्कृष्टतेचा ध्यास घेत संस्थेने सर्वच केंद्रांमध्ये अध्ययनासाठी पोषक वातावरण समृद्ध केलेले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना उच्चप्रतीचे शैक्षणिक स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रगत अध्ययनासाठी मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. शिक्षकांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापन नेहमीच तत्पर असते. उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट कर्मचारी यासारखे पुरस्कार दरवर्षी प्रदान करुन उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा यथोचित गौरव केला जातो. उत्कृष्ट संस्था पुरस्कार, उत्कृष्ट वार्षिक अंक पुरस्कार यासारखे पुरस्कार प्रदान करुन संस्थेने एक उपक्रमशील, प्रेरणादायी व विश्वासार्ह वातावरण विकसित केलेले आहे.

विद्यार्थी देवो भव! : नामदार गोखलेंच्या नाममुद्रेने असलेली ही शिक्षणसंस्था स्वार्थरहित व राजकारणविरहीत कार्य करीत आहे. अध्यात्माची बैठक असलेल्या या संस्थेने विद्यार्थी देवो भव! हा मूलमंत्र जपत सात्विकतेची उदात्त कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. या शिक्षणसंस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांना कामाचे उच्चतम समाधान लाभत आहे. त्यामुळे अनेकांची जीवने उजळून निघाली आहेत. शिक्षणक्षेत्रात या संस्थेने व्रतस्थ वृत्ती व समर्पण भाव जोपासला असून आपली एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित केली आहे. संस्थेने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाची अनेक क्षेत्रे विस्तीर्ण केली आहेत.

उदार देणगीदार व सेवाव्रती प्रज्ञावंतांची मांदियाळी : संस्थेला हंसराजशेठ ठाकरसी, भिकुसा यमासा क्षत्रिय प्रा. लिमिटेड, रामनाथशेठ चांडक, नरसिंगदासशेठ चांडक, जयरामभाई बिटको, रामनाथशेठ कलंत्री, जयकुमार पाठारे, बाबाशेठ कोठारी, आर. एच. सपट, दिग्विजयभाई कपाडिया यासारख्या दानशुरांनी दिलेल्या बिनशर्त व उदार देणग्यांमधून शिक्षणकेंद्रे सुसज्ज बनली आहेत.

थोर शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांना सुरुवातीपासूनच आचार्य शंकरराव भिसे, पूज्य चित्रे गुरुजी, प्रिं. आत्मारामपंत सावे, आचार्य दादासाहेब दोंदे, श्री. लाड, श्री. संझगिरी, श्री. मुल्हेरकर, प्राचार्य एस. जी. पुराणिक, प्राचार्य प्र. दा. राजदेरकर, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक, प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य एस. बी. पंडित यासारख्या अनेक निष्ठावान व सेवाव्रती प्रज्ञावंतांची मांदियाळी लाभली. या प्रज्ञावंतांनी दिलेल्या योगदानातून संस्थारुपी छोट्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे.

संस्था माजी विद्यार्थी व आजचे विद्यार्थी, देणगीदार, शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर यांचा यथोचित सन्मान करीत आहे आणि या घटकांबरोबर चांगले सलोख्याचे संबंध जपत आहे. आज गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता कल बघता ही संस्थेने गेल्या 100 वर्षांत केलेल्या भरीव कार्याची फलनिष्पत्ती म्हणावी लागेल.

गतिमान नेतृत्व : आज संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित, सचिव सर डॉ. मो. स. गोसावी व संचालिका – एच.आर.एम. प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे संस्थेला गतिमान नेतृत्व देत आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था शतक महोत्सव दमदारपणे साजरा करीत आहे तसेच 21 व्या शतकातील शिक्षणक्षेत्रातील उदयोन्मुख आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज झाली आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणातून लाखो विद्यार्थी आणि हजारो शिक्षक व कर्मचार्‍यांचे जीवन तेजस्वी बनविणार्‍या या अग्रगण्य शिक्षणसंस्थेला शतक महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा! तसेच उत्तरोत्तर भरभराटीसाठी शुभकामना!

– डॉ. महेश दिलीप औटी, 

उपप्राचार्य, चांडक-बिटको-चांडक महाविद्यालय,
नाशिकरोड

LEAVE A REPLY

*