Type to search

Featured

चॉकलेट, बिस्किटाच्या गोडाऊनला आग

Share

50 लाखांचा माल खाक

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील एस. के. एण्टरप्रायजेसच्या चॉकलेट आणि बिस्किटांच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये सुमारे 50 लाखांपेक्षा अधिक किमतीचा माल जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी (दि. 20) पहाटे घडली. सलग नऊ तास आग धुमसत होती. महापालिका अग्निशामक दलाच्या सात बंबांनी आग नियंत्रणात आणली. केडगाव ते सारोळा कासार रोडवर सोनेवाडी गावाजवळ संदीप फाटक यांच्या मालकीचे एस. के. एण्टरप्रायजेसचे गोडाऊन आहे. फाटक यांच्याकडे पारले कंपनीच्या चॉकलेट व बिस्किटांसह विविध खाद्य पदार्थ्यांच्या उत्पादनाची एजन्सी आहे. या गोडाऊनमध्ये त्यांनी सुमारे 50 ते 60 लाखांचा माल साठवून ठेवला होता.

बुधवारी 19 जून सायंकाळी फाटक व त्यांचे कर्मचारी गोडाऊन बंद करून घरी गेले होते. गुरुवारी पहाटे 2 ते 2.30 च्या सुमारास गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गोडाऊनमधून धूर बाहेर येऊ लागल्याने शेजारी राहणार्‍या नागरिकांनी फाटक यांना फोन करून माहिती दिली. फाटक केडगाव येथे राहतात. आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडाऊन हे गावापासून दूर अंतरावर असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नाही. महापालिका अग्निशामक दलाचे वाहन चालक चिंधू भांगरे, फायरमन बाबा कदम, रवींद्र कोतकर, बाळासाहेब घोरपडे, दत्तू शिंदे, पांडुरंग झिने, विजय शिंदे, मच्छिंद्र गायकवाड आदींनी घटनास्थळी आग विझविण्यासाठी परीश्रम घेतले. गोडाऊनमधील सर्व मालाला प्लॅस्टिकचे आवरण असल्याने आग सुमारे 9 तास धुमसत होती. पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. यात सुमारे 50 ते 60 लाखांचा माल जळून खाक झाल्याचे फाटक यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!