गोदावरीसह चार नद्यांना झळाळी

0
तपोवनातील कपिला संगम येथे नद्या स्वच्छता मोहीमेत झाडूने सफाई करतांना महापौर, आयुक्त, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व अधिकारी.
नाशिक | दि.४ प्रतिनिधी- जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधत नाशिक महापालिकेच्या वतीने आज (दि.४) शहरातील एनजीओ यांच्या मदतीने गोदावरी नदी, वाघाडी, नासर्डी व वालदेवी नदीत १६ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवित १६० टन कचरा संकलन करीत तो खत प्रकल्पावर टाकण्यात आला.
या मोहीमेतून या नद्यांना नवीन झळाली मिळाली आहे. आजच्या मोहीमेतून महापालिकेने ‘पर्यावरण संरक्षण जनसहभागातून’हा संदेश दिला. महापालिकेच्या वतीने जनसहभागातून गोदावरी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेचा शुभारंभ पंचवटीतील तपोवन भागात असलेल्या कपिला संगमाजवळ झाला.

याठिकाणी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे व आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर या सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांनी हातात झाडु घेत संगमाकडे जाणार्‍या पायर्‍या व सपाटीकरण केलेल्या भागातील कचरा झाडून काढला.

त्याचबरोबर या परिसरात महापालिका अधिकारी व कर्मचारी व एनजीओच्या कार्यकर्त्यांनी नदीकाठालगतच्या भागात जमलेले प्लास्टीक व कचरा जमा करीत स्वच्छता केली. त्यांनतर वाहनातून हा जमा केलेला कचरा खत प्रकल्पावर पाठविण्यात आला. याठिकाणी उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे, कार्य. अभियंता शिवकुमार वंजारी यांच्यासह अधिकारी हजर होते.
या मोहीमेत तपोवनासह गोदावरी नदी होळकर पूल ते गौरी पटांगण, गौरी पटांगण ते टाळकुटेश्‍वर पूल, टाळकुटेश्‍वर पूल ते लक्ष्मीनारायण घाट, लक्ष्मीनारायण घाट ते तपोवन, टाकळी पूल परिसर व घाट, नांदूर-मानूर परिसर व घाट, आय.टी.आय. पूल ते सिटी सेंटर मॉल, सिटी सेंटर मॉल ते तिडके कॉलनी, चारहत्ती (लक्ष्मण झुला) व रोकडोबावाडी पूल ते कॅम्प ब्रीज व विहितगाव या भागाचा समावेश होता.

तसेच काही सामाजिक संस्थांनी बालाजी मंदीर, सोमेश्‍वर मंदीर, आनंदवल्ली, सहदेवनगर व चोपडा लॉन्स याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. या मोहीमेत महापालिकेचे २५०० अधिकारी व कर्मचारी, तसेच शहरातील ७० एनजीओ यांचे अडीच हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महापालिकेकडुन १ रोबोटीक मशिन, १ पोकलेन, १६ जेसीबी, १४ डंपर व २० टॅ्रक्टर सहभागी करुन घेण्यात आले होते. या संपुर्ण मोहीमेत ३ तासात १६० टन कचरा संकलीत करुन तो खत प्रकल्पावर पाठविण्यात आला.

LEAVE A REPLY

*