गोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले

0

सोनेवाडी (वार्ताहर) – गोदावरी नदीपात्रातील बंधार्‍यात अडविलेले पाणी शेतकर्‍यांच्या विरोधानंतरही पोलीस बंदोबस्तात जायकवाडीला सोडण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील डाऊच, हिंगणी, सडे, शिंगवे आदी बंधार्‍यांच्या फळ्या काढण्यासाठी शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाणी सोडून दिले. यावेळी शेकडो शेतकरी बंधार्‍याजवळ जमले होते. विरोध करूनही पाणी सोडल्यानंतर शेतकर्‍यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

दारणा धरण समुहातून जायकवाडीला2.64 टीएमसी पाणीसोडण्यात आले होते. परंतु गोदावरी नदीवर असलेल्या बंधार्‍यांमध्ये शेतकर्‍यांनी पाणी अडविले असल्याची ओरड मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर गोदावरी महामंडळाने हे अडविलेले पाणी सोडून देण्याचे आदेश नाशिक जलसंपदा विभागाला दिले होते. या निर्णयाला गोदाकाठच्या शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध केला. पोलीस प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करून कायदा सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

यामुळे शेतकर्‍यांनी बंधार्‍याकडे पाठ फिरवत गावात एकत्र जमून शासनाचा निषेध नोंदविला. डाऊच खुर्द व हिंगणी बंधार्‍यांतून 63. 42 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासूनच पाणी सोडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली होती.

डाऊच खुर्द बंधार्‍यावर जेसीपी मशीन जाण्याची व्यवस्था नसल्याने पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्वतः बंधार्‍यावरील असलेल्या नऊ-दहा गेट वरील फळ्या काढल्या. डाऊच खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी गावातील साई मंदिरात सरकारच्या नावाने निषेध सभा घेऊन सरकारचा निषेध केला.हिंगणी बंधार्‍यात जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वी 3.84 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते तसेच डाऊच खुर्द बंधार्‍यात काही प्रमाणात पाणी शिल्लक होते. त्यामुळे सर्वच पाणी जायकवाडीला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी के.डी. पाटील यांनी सांगितले. हिंगणी बंधार्‍यातील पूर्वीचे 3.680 दशलक्ष घनफूट पाणी राखून ठेवून बाकीचे पाणी सोडून देण्यात आले.

हिंगणी बंधार्‍यात पूर्वीचे पाणी शिल्लक होते आणि ते पाणी पुन्हा जायकवाडीकडे सोडू नये म्हणून अनेक ठिकाणी आम्ही निवेदने दिली परंतु निवेदनाचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही व हे पाणी सोडलेले आहे. त्यामुळे परिसरात पाणी प्रश्न बिकट होणार आहे. याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार आहे.
– सरपंच जिजाबाई पवार

डाऊच बंधार्‍यावर हजारो लोकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अवलंबून आहे. हक्काचे पाणी गुरा-ढोरांना पिण्यासाठी राहणार नाही. इंग्रज सरकार प्रमाणे हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. पाणी सोडल्यानंतर होणार्‍या पाणीटंचाईला हे सरकार जबाबदार असणार आहे. येणार्‍या निवडणुकीवर आम्ही पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहोत.
– सरपंच संजय गुरसळ

LEAVE A REPLY

*