गोदाकाठ, ऐतिहासिक मंदिरात भाविकांची मांदियाळीे पंचवटी तीर्थक्षेत्र पर्यटकांनी बहरले

0

पंचवटी २२ वार्ताहर- दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमिवर सुट्टीच्या आनंद घेण्यासाठी विविध राज्यातील पर्यटक तसेच भाविक पंचवटी परिसरांत दाखल झाले आहे. गोदाकाठ परिसर तसेच पुरातण मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून या निमित्ताने पंचवटीतील गोदाकाठ परिसर गर्दीने बहरुन गेला आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे परिसरांतील व्यावसायिकांची खर्‍या अर्थाने दिवाळी होत असून त्याच्यात देखील चैतन्य निर्माण झाले आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमिवर सुट्टी असल्याने शनिवारपासून पंचवटी परिसरांत पर्यटकांचे आगमन सुरू झाले आहे. खासकरून गुजराथ, राजस्थान, नवी मुंबई, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यातून पर्यटक पंचवटी दाखल होत आहे.

पंचवटी परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्याने दिवाळीच्या सुट्टीत विविध राज्यातील पर्यटक पर्यटनासाठी पसंती देत असतात. पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, गोरेराम मंदिर, नारोशंकर मंदिर, श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर, गोदाकाठ परिसर तसेच तपोवन परिसरांत पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.

खासगी वाहन अथवा टॅ्रव्हल बसेसच्या माध्यमातून परराज्यातून आलेले भाविक देवदर्शना बरोबरच पर्यटनाचा आनंद घेत आहे. यावर्षी शहरात चांगला पाऊस झालेला असल्याने गोदावरी नदीपात्र वाहते असल्याने भाविकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. भाविकांच्या आगमनामुळे परिसरांतील व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत आहे. रिक्षाचालक तसेच गाईड येथे आलेल्या भाविकांना पंचवटी दर्शन घडवून आणत आहे.

पर्यटकांच्या गर्दीमुळे रिक्षाचालक व गाईड व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांबरोबरच नाशिकचा चिवडा, बेदाणे प्रसिध्द असल्याने याला देखील पर्यटकांकडून चांगली मागणी आहे. परिसरांतील हॉटेल, लॉज, धर्मशाळा यांना देखील चांगली मागणी आहे.

पर्यटकांच्या वाहनांनी रामकुंड व म्हसोबा महाराज पटांगण येथील वाहनतळ फूल होत आहे. भाऊबीज सणानंतर पंचवटी परिसरांत पर्यटकांंचे आगमन झाल्याने लहान-मोठे व्यावसायिक खर्‍या अर्थाने दिवाळी सणाचा आनंद घेत आहे. पुढील आठवडाभर पर्यटकांची गर्दी सुरुच राहिल, अशी अपेक्षा असल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*