गोदावरीला पूर; काथ नाला पुलावर पाणी

0
पुणतांबा (वार्ताहर)- नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पंचवीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी वेगाने वाढल्यामुळे मंगळवारी सकाळी 10 वाजेपासूनच काथ नाला पुलावर पाणी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत पुलावर दोन फुटापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे पुणतांबा मार्गे श्रीरामपूर व कोपरगावला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अनेक मोटार सायकलस्वारांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुलाच्या मध्यभागी पाण्यामुळे मोटरसायकल बंद पडत होत्या. दुपारी एक वाजेनंतर येथील कोल्हापूर पध्दतीच्या वसंत बंधार्‍यावरूनही पाणी वाहू लागल्यामुळे बंधार्‍याच्या पुलावरून डोणगाव, लाख बापतरा गावाकडे जाणार्‍या ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाने गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावरून ये-जा करणे पसंद केले.
दुपारी तीन नंतर वसंत बंधार्‍यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. कोल्हापूर पध्दतीच्या वसंत बंधार्‍यात लोखंडीफळ्या टाकून पूर्ण क्षमतेने पाणी अडविले आहे. नदीपात्रात ज्यादा पाणी आल्यामुळे फळ्यांना धोका होणार नाही असा विश्वास बंधारा समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*